मुंबई : विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी भाजपातर्फे माजी मंत्री हरिभाऊ बागडे यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. ते मंगळवारी उमेदवारी अर्ज भरतील.
अध्यक्षपदासाठी पुण्यातील ज्येष्ठ आमदार गिरीश बापट यांचेही नाव आघाडीवर होते. मात्र त्यांना विस्तारामध्ये मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल, असे मानले जात आहे. बापट हे अध्यक्षपद स्वीकारण्यास नाखूश होते. त्यांनी मंत्रिपदाचा आग्रह धरला होता. जळगाव जिल्ह्यातील आमदार हरिभाऊ जावळे यांच्याही नावाची चर्चा होती. मात्र शेवटी बागडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. बागडे हे मराठा समाजाचे असून, औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री मतदारसंघातून पाचव्यांदा विधानसभेवर निवडून आलेले आहेत. 1995 ते 97 दरम्यान ते रोहयोमंत्री होते आणि 1997 ते 99 दरम्यान अन्न व नागरी पुरवठामंत्री होते. त्यांच्या निमित्ताने विधानसभेचे अध्यक्षपद मराठवाडय़ाला मिळू शकते. हंगामी अध्यक्ष जिवा पांडू गावित यांनी अध्यक्षांच्या निवडणुकीचा कार्यक्रम सोमवारी सभागृहात जाहीर केला. त्यानुसार गरज भासल्यास बुधवारी मतदान होणार आहे. (विशेष प्रतिनिधी)