मुंबई - वाहतूक नियम पाळण्याचे संदेश देणारेच वाहतूक नियमांची पायमल्ली करत असल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांचा राजीनामा घेण्यासाठी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे चक्क दुचाकीवर आल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मात्र या व्हिडिओत बागडे यांना दुचाकीवर बसवून आणणाऱ्या चालकाच्या डोक्यात हेल्मेट नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे हेल्मेट वापरायचा सांगणारेच हेल्मेटविना प्रवास करत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव हे हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा देण्यासाठी औरंगाबादमध्ये आले होते. त्यावेळी हरीभाऊ बागडे हे त्यांच्या मतदारसंघात सुरू असलेल्या कामांची पाहणीसाठी गेले होते. जाधव हे एका खाजगी कार्यलयात वाट पाहात थांबले असल्याचा निरोप मिळताच बागडे तिकडे निघाले. मात्र रस्त्यात रेल्वे रुळाजवळ फाटक लागलं असल्याने, हरीभाऊ बागडे यांनी कार सोडून पायी रेल्वे रूळ ओलांडला आणि दुसऱ्या बाजूला असलेल्या दुचाकीवर बसून भास्कर जाधवांना भेटण्यासाठी आले.
मात्र बागडे ज्या दुचाकीवर बसून आले, त्याच्या चालकाने हेल्मेट घातलेले नव्हते. त्यामुळे आता बागडे यांच्यावर टीका होत असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. तर कायद्याचा सन्मान आणि भीती नसणे हे योग्य नाही, असे म्हणणारे गडकरींच्या पक्षातील लोकं जर वाहतुकीचे नियम पाळत नसतील तर सामान्य लोकांकडून त्यांनी अपेक्षा ठेवणे कितपत योग्य आहे.