मुंबई : विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी काँग्रेसबद्दल काढलेल्या उद्गारामुळे बुधवारी विधानसभेत गदारोळ झाला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेस, राष्ट्रवादीचे काही सदस्य डायसवर चढून त्यांनी संताप व्यक्त केला.
काँग्रेसच्या नसीम खान यांना काही मुद्यांवर बोलायचे होते. त्यांच्या हातवा-यांवर संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी तीव्र आक्षेप घेतला व अध्यक्षांशी बोलण्याची ही पद्धत प्रथापरंपरेला धरून नाही. हीच तुमची संस्कृती आहे का, असा सवाल केला. नसीम खान यांना बोलण्याच्या ओघात अध्यक्ष बागडे यांनी काँग्रेस पक्षाबाबत काही वक्तव्य केले. त्यामुळे विरोधकांचा भडका उडाला.
विखे पाटील पहिल्यांदाच अध्यक्षांसमोरील डायसवर चढले. वसंत चव्हाण यांनी राजदंड उचलला. अध्यक्षांचे विधान कामकाजातून काढण्याची मागणी त्यांनी केली. विरोधकांच्या भावना लक्षात घेऊन बागडे म्हणाले की, आपण रेकॉर्ड तपासून पाहू आणि आवश्यकता असल्यास ते कामकाजातून काढण्यात येईल.