जितेंद्र कालेकर,
ठाणे- येथील प्रादेशिक मनोरुग्णालयाजवळील चेकमेट सर्व्हिसेस प्रा. लि. या खासगी वित्त कंपनीवर ठाणे आणि नाशिकच्या सशस्त्र टोळीने दरोडा टाकून सुमारे ११ कोटी ८० लाखांची लूट केली होती. या प्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने कंपनीतील अमोल कार्ले या कर्मचाऱ्यासह १६ जणांना अटक केली होती. त्याचा या दरोड्यात सहभाग नसल्याचे पुरावे मिळाल्यानंतर खटल्याच्या सुनावणीपूर्वीच त्याची सुटका झाली आहे. दरम्यान, दरोडेखोरांकडून हस्तगत केलेली लुटीतील रोकड संबंधित कंपनीला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.‘चेकमेट’वर दरोडा टाकून अमोलसह त्याच्या १४ साथीदारांनी २८ जून २०१६ रोजी सुमारे ११ कोटींची लूट केली होती. कंपनीतून नेमकी किती रोकड गायब झाली, याचा अंदाज न आल्याने कंपनीने सुरुवातीला ५ कोटींचा, त्यानंतर नऊ कोटी १६ लाखांचा दरोडा पडल्याची फिर्याद वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात नोंदविली होती. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी तब्बल २७५ पानांचे आरोपपत्र दाखल केले असून, १५ आरोपींविरुद्ध ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात आरोप निश्चिती अलीकडेच केली आहे.रोकड ‘चेकमेट’ला देण्याचे आदेशया दरोडयात सुरुवातीला ४ कोटी १८ लाख त्यानंतर ९ कोटी ११ लाख तर शेवटी ११ कोटी ८० लाखांची रोकड चेकमेटने ठाणे पोलिसांकडे न्यायालयामार्फत मागितली. वेगवेगळ्या रकमांच्या उल्लेखामुळे कनिष्ठ न्यायालयाने ही रक्कम कंपनीला देण्याचा अर्ज फेटाळला होता. मात्र, कंपनीने जिल्हा सत्र न्यायालयात पुन्हा अर्ज करून पुन्हा जितकी रक्कम दरोडेखोरांकडून जप्त केली तितकीच म्हणजे दहा कोटी आठ लाख ५५ हजार ६१५ इतकी रोकड ‘चेकमेट’ कंपनीला देण्याचे आदेश पोलिसांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.>असा अडकला मते...या दरोड्याचा दोन वेळा प्रयत्न झाला. पहिल्या प्रयत्नाच्या वेळी झालेल्या मिटींगमध्ये नाशिकचा हरिश्चंद्र मते या टोळीसमवेत होता. दुसऱ्यांदा २८ जूनच्या आदल्या दिवशी मात्र त्याने या टोळीसमवेत येण्याला नकार दिला आणि फोन बंद करून ठेवला. दरोड्यातील त्याच्या साथीदारांनीही फोन बंद ठेवले. एकाच वेळी मतेसह सर्वच १६ जणांचे फोन बंद आढळल्याने तसेच पहिल्या दरोड्याच्या प्लॅनिंग मिटींगमध्ये मते असल्याने तोही या आरोपींबरोबर गोवला गेला. >आणि असा सुटला... त्याच्या साथींदारांनी दिलेली माहिती आणि परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे तसेच दरोडयातील लुटीतील कोणतीही रोकड त्याच्याकडे किंवा त्याच्या नातेवाईकांकडे मिळाली नाही. तो घटनास्थळीही नव्हता. त्याची आई आणि पत्नीने दिलेली जबानीही पोलिसांनी पडताळली. हीच माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पासलकर यांच्या पथकाने न्यायालयात सादर केली. ठाणे न्यायालयानेही कलम १६९ अन्वये त्यावर शिक्कामोर्तब करीत त्याचे चेकमेट दरोडयातील आरोपींच्या यादीतील नाव वगळले. त्यामुळेच हा खटला सुरु होण्यापूर्वीच दरोडयाचा कलंकही त्याच्या नावावरुन पुसण्यात पोलिसांना यश आले.