मुंबई - लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना इंदापूर विधानसभा मतदार संघातून आघाडी मिळवून दिल्याचे फळ काँग्रेसचे माजी आमदार आणि माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांना मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार यांनी विधानसभा निवढणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना सूचक इशारा दिला आहे.
लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने अनेक डावपेच आखले होते. अख्ख मंत्रीमंडळ सुळे यांच्या पराभवासाठी रिंगणात उतरले होते. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी एकत्र निवडणूक लढवली होती. यापैकी इतर मतदार संघात उभय पक्षांनी एकमेकांना किती साथ दिली हा संशोधनाचा विषय असला तरी, इंदापूरमध्ये काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्या मागे कुमक उभी केली होती. त्यामुळे सुळे यांना इंदापूरमधून तब्बल ७१ हजार मतांची मोठी आघाडी मिळाली होती.
सुप्रिया सुळे यांना दौंड आणि खडकवासला मतदार संघातून पिछाडी मिळाली होती. मात्र इंदापूरने त्यांना मोठी आघाडी दिली. या आघाडीत हर्षवर्धन पाटील आणि भरणे या दोघांचे योगदान असले तरी येथील मताधिक्य देण्याचं फळ हर्षवर्धन पाटील यांच्यात झोळीत पडण्याची शक्यता आहे. वाटाघाटीत हा मतदार संघ काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भरणेंचा मतदार संघ कोणता असा प्रश्न उपस्थित होणार आहे.
नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात अजित पवार यांनी भरणे यांना टोला लगावला होता. इंदापूरचे लाडके आमदार दत्तामामा भरणे यांच तमाम बारामतीकरांच्या वतीने स्वागत. प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, लोभ टीकावा हिच अपेक्षा असा, सूचक इशारा पवार यांनी दिला होता. त्यामुळे भविष्यातील राजकीय घडामोडींचा कानोसा घेऊन तर अजित पवार यांनी भरणेंना टोला लगावला नसेल ना, अशी चर्चा आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे, हा मतदार संघ काँग्रेसला दिल्यास, नाराज भरणे भाजपमध्ये जाण्याची शक्यता असून अजित पवारांनी भरणेंना लगावलेल्या टोल्याची इंदापूरमध्ये चर्चा आहे.