मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने मुलुंड येथील जॉन्सन ॲण्ड जॉन्सन कंपनीच्या उत्पादकाच्या उत्पादनाचा परवाना रद्द केला आहे. या बहुराष्ट्रीय कंपनीच्या बेबी पावडरच्या सौंदर्य प्रसाधनांचे नमुने नाशिक, पुणे येथील औषध निरीक्षकांनी गुणवत्ता चाचणीकरिता घेतले होते. हे नमुने सदोष आढळल्याने कंपनीचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात आला आहे.
मुंबई येथील औषध नियंत्रण प्रयोगशाळेच्या शासकीय विश्लेषकांनी हे नमुने अप्रमाणित असल्याचे घोषित केले आहे. तसेच, हे नमुने अप्रमाणित असल्याचा निर्वाळा दिला आहे. अप्रमाणित घोषित नमुन्याच्या अनुषंगाने संस्थेची अनुज्ञप्ती रद्द का करण्यात येऊ नये अथवा नमूद केलेल्या परवान्याअंतर्गत मंजूर असलेल्या सौंदर्य प्रसाधनांची उत्पादन अनुमती निलंबित/रद्द का करू नये, याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.
संस्थेने उत्पादनाचा साठा बाजारातून परत बोलावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नमुन्याचे प्राप्त शासकीय विश्लेषकाचे अहवाल मान्य नाही म्हणून संस्थेने केंद्रीय औषध प्रयोगशाळेकडून फेरचाचणी होण्यासाठी नाशिक व पुणे न्यायालयात अर्ज केला होता. केंद्रीय औषध प्रयोगशाळेकडून फेरचाचणीत नमुन्यांची चाचणी होऊन संचालक, केंद्रीय औषध प्रयोगशाळा, कोलकाता यांनी त्यांचा अहवाल प्रसाधनातील सामू (पीएच) स्तर अयोग्य असल्याच्या कारणासाठी अप्रमाणित घोषित केलेला आहे.
लहानग्यांच्या त्वचेस ठरेल अपायकारकजॉन्सन ॲण्ड जॉन्सनची पावडर प्रामुख्याने नवजात बाळांसाठी मोठ्या प्रमाणात वापर होतो. साठ्याच्या उत्पादन पद्धतीमध्ये दोष असल्यामुळे उत्पादनाचा सामू (पीएच) हा प्रमाणित मानकानुसार नाही. त्याच्या वापराने नवजात शिशू व लहान मुलांच्या त्वचेस अपाय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपरोक्त उत्पादन सुरू ठेवणे हे व्यापक जनहिताच्या दृष्टीने योग्य होणार नाही त्यामुळे संस्थेच्या मुलुंड, मुंबई या उत्पादन कारखान्याचा ‘जॉन्सन बेबी पावडर’ या उत्पादनाचा परवाना १५ सप्टेंबरच्या आदेशाद्वारे कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. जॉन्सन बेबी पावडर हा ब्रॅण्ड २०२३ पासून बाजारातून मागे घेण्याचा निर्णय नुकताच म्हणजे ११ ऑगस्ट रोजी जाहीर केला होता. या पावडरची विक्री अमेरिका आणि कॅनडामध्ये दोन वर्षांपूर्वीच थांबविलेली आहे.