मुंबई : शिवसेना-भाजपाच्या जागावाटपाचे प्रस्ताव इकडून-तिकडे गेले असले तरी संक्रांत आडवी आल्याने प्रत्यक्ष बोलणीचा मुहूर्त रविवारपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. तोपर्यंत पतंगबाजी रंगणार आहे.मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत युतीवर संक्रांत येणार की समझोत्याचा तीळगूळ वाटणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. ‘युतीबाबत मी सकारात्मक आहे; पण भाजपाकडून येणारा प्रस्ताव अवास्तव असेल आणि तो स्वीकारणे शक्य नसेल तर स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा,’ असे आदेश शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पक्षाचे मंत्री आणि नेत्यांच्या बैठकीत दिल्याचे समजते. भाजपाकडून आम्हाला चर्चेचा प्रस्ताव आलेला आहे, १५ तारखेला बहुतेक चर्चा होईल, असे शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी ‘लोकमत’ला सांगितले. त्यामुळे युतीबाबत आता संक्रांतीनंतरच काय ते ठरणार आहे.सूत्रांनी सांगितले की, भाजपाकडून केवळ मुंबई महापालिका निवडणुकीतील समझोत्यासंदर्भात चर्चा करायची आहे, असा निरोप आल्यानंतर १५ तारखेला पहिली बैठक घेण्याचे ठरले आहे. उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे युतीसाठी सकारात्मक आहेत आणि ते त्यांनी जाहीरपणे सांगितले आहेच. त्या अनुषंगाने दोन्ही पक्षांमध्ये चर्चा होईल, असे देसाई यांनी स्पष्ट केले. सूत्रांनी सांगितले की, समझोत्याचा कोणताही फॉर्म्युला भाजपाने अद्याप दिलेला नाही. तसेच शिवसेनेनेदेखील अद्याप आपले पत्ते उघडलेले नाहीत. उद्धव ठाकरे यांनी आज घेतलेल्या मंत्री आणि नेत्यांच्या बैठकीत युतीसंदर्भात चर्चा झाली. भाजपाने अवाजवी (८० किंवा त्यापेक्षा जास्त) जागा मागितल्या तर युती केली जाणार नाही असा बैठकीचा सूर होता, अशी माहिती आहे. स्वबळावर लढलो तर आम्ही शंभरपेक्षा जास्त जागा जिंकू. युती म्हणून एकत्रितपणे लढलो तर १३० ते १३५ जागा दोघांना मिळतील. याचा अर्थ स्वबळावर लढण्याचा शिवसेनेला नक्कीच फायदा होईल, असे शिवसेनेच्या एका खासदाराने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. युती झाली तर शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांमध्ये बंडखोरी मोठ्या प्रमाणात होईल आणि त्याचा फटका दोन्ही पक्षांना बसेल. तसेच, तगड्या बंडखोरांना मनसे आपल्या गळाशी लावून फायदा घेईल, असा तर्क स्वबळावर लढण्याची तीव्र इच्छा असलेले दोन्ही पक्षांतील नेते आपल्या शीर्षस्थ नेत्यांना देत आहेत. (विशेष प्रतिनिधी) चर्चा फक्त ठाणे-मुंबईपुरतीशिवसेना-भाजपामध्ये जागावाटपाची चर्चा फक्त मुंबई आणि ठाणे या दोन महानगरपालिका निवडणुकीपुरतीच असून, उर्वरित महापालिकांमध्ये युती करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात आल्याचे भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.मुंबईत स्वबळावर लढणार काँग्रेस : मुंबई पालिकेत राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याचा प्रश्नच येत नाही. हे आधीच स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच तर राष्ट्रवादीने उमेदवारांची यादी जाहीर केली, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी सांगितले. मात्र, एकटे निरुपम सोडले तर बाकीच्या नेत्यांना राष्ट्रवादीसोबत आघाडी हवी आहे, असे मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन अहिर यांचे म्हणणे आहे.
युतीला संक्रांत आडवी
By admin | Published: January 14, 2017 5:30 AM