राजेंद्र दर्डा यांची भावपूर्ण श्रद्धांजली औरंगाबाद : जमिनीवर पाय असलेला व गगनाला गवसणी घालण्याची क्षमता असलेला नेता आबांच्या रुपाने हरपला, अशा भावपूर्ण शब्दांत राज्याचे माजी मंत्री व लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी सांगितले की, २००४ साली आबा गृहमंत्री असताना त्यांचा गृहराज्यमंत्री म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली. मंत्रिमंडळात एकत्रितपणे काम करण्याची संधी मिळाली. मंत्रिमंडळात जनतेच्या प्रश्नांवर आपल्या नेत्यांना काय वाटेल, याची पर्वा न करता स्पष्ट विचार मांडताना मी त्यांना पाहिले आहे. २००४ साली केंद्र सरकारने त्यांच्या खर्चाने महाराष्ट्र राज्याला विशेष पोलीस दल- भारत बटालियन स्थापन करण्याचे ठरविले. गृहराज्यमंत्री म्हणून मी आबांकडे भारत बटालियन औरंगाबादला व्हावे म्हणून प्रस्ताव घेऊन गेलो. त्यांची इच्छा जरी हे दल आपल्या सांगलीत जिल्ह्यात स्थापन व्हावे, अशी होती, तरी त्यांनी औरंगाबादला मंजुरी दिली व भारत बटालियन औरंगाबादला स्थापन झाले. भारत बटालियनच्या माध्यमातून आबा औरंगाबादकर व मराठवाड्याच्या जनतेच्या कायम लक्षात राहतील, असे दर्डा म्हणाले.
गगनाला गवसणी घालण्याची क्षमता असणारा नेता हरपला
By admin | Published: February 17, 2015 2:08 AM