लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : सूर्य आग ओकत असल्याने महाराष्ट्र चांगलाच तापू लागला असून अकोला, जळगाव, यवतमाळ, चंद्रपूर ही शहरे सर्वांत उष्ण ठरत आहेत. येथील कमाल तापमान ४५ अंशांवर गेले आहे. येत्या पाच दिवसांमध्ये अकोला आणि चंद्रपुरात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. रविवारी राज्यात यवतमाळला उच्चांकी ४६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
नैर्ऋत्य मान्सूनची वाटचाल बंगालच्या उपसागराच्या नैर्ऋत्य, मध्य व ईशान्य भागात झाली आहे. कोकण-गोवा व मध्य महाराष्ट्रात पुढील पाच दिवस, तर मराठवाडा, विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात व विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
विदर्भ, मराठवाड्यातील जिल्हे उष्ण झळांनी भाजून निघत आहेत देशामध्ये राजस्थानातील बारमेरमध्ये यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४८.८ अंश तापमान नोंदले गेले. पाकिस्तान व अफगाणिस्तानमार्गे वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे वायव्य आणि मध्य भारतात उष्मा वाढत आहे.
राज्यातील कमाल तापमान
- यवतमाळ ४६.०
- अकोला ४५.२
- गोंदिया ४४.४
- अमरावती ४४.२
- वर्धा ४४.१
- परभणी ४४.०
- नांदेड ४३.५
- वाशिम ४३.४
- चंद्रपूर ४३.२
- नागपूर ४२.४
- बीड ४२.०
- छ. संभाजीनगर ४१.८
- जळगाव ४०.७
- मालेगाव ४०.४
- सोलापूर ४०.४
- धाराशिव ३९.४
- चाळीसच्या आतील शहरे: पुणे, कोल्हापूर, महाबळेश्वर, नाशिक, सांगली, सातारा, मुंबई, रत्नागिरी, बुलढाणा.
राजस्थान, पंजाब आणि विदर्भातील काही शहरांत उष्णतेची लाट आहे. अकोल्यात पुढील पाच दिवस उष्णतेची लाट येणार आहे. तापमानामुळे कलम १४४ लागू होणे हे पहिल्यांदाच ऐकत आहे. अशा प्रकारचा निर्णय घेतल्याचे ऐकिवात नाही, परंतु नागरिकांनी घराबाहेर पडू नये आणि त्यांना उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून या सूचना दिल्या असाव्यात.- डॉ. अनुपम कश्यपी, माजी प्रमुख, भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणे.