लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई/इंदापूर : काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी मुंबईत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव राजवर्धनही उपस्थित होते. हर्षवर्धन पाटीलशरद पवार गटात प्रवेश करणार असून इंदापूर मतदारसंघामधून ते तुतारी चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. त्यांची कन्या अंकिता पाटील - ठाकरे यांनी व्हॉटस् ॲप स्टेटसवर ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे निवडणूक चिन्ह ठेवल्याने प्रवेशाच्या घोषणेची केवळ औपचारिकता बाकी असल्याचे बोलले जाते.
महायुतीत इंदापूरमध्ये अजित पवार गटाचे दत्ता भरणे हे आमदार आहेत. त्यामुळे जागावाटपात ही जागा अजित पवार गटाकडे जाणार आहे. हर्षवर्धन पाटील यांना इथून निवडणूक लढवायची असून भाजपला जागा सुटणार नसल्याने त्यांच्यासमोर अपक्ष उभे राहायचे किंवा शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळवायची हे दोन पर्याय होते. शरद पवार गटाकडेही या मतदारसंघात सक्षम उमेदवार नसल्याने पाटील यांचा शरद पवार गटातील प्रवेश सोपा झाला आहे.
पाटील यांनी २०१९ च्या निवडणुकीच्या आधी भाजपत प्रवेश केला होता आणि त्यांनी भाजपकडून २०१९ ची विधानसभा निवडणूक लढवली होती. दत्ता भरणे यांनी त्यांचा पराभव केला होता. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भरणे यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासाठी जोर लावूनही इंदापूरमधून सुप्रिया सुळे यांना २५ हजार मतांची आघाडी मिळाली होती.
‘वेट ॲण्ड वॉच’ नंतर...हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत, अशा चर्चा गेल्या महिनाभरापासून सुरू आहेत. मात्र, महायुतीची इंदापूरची उमेदवारी जाहीर होईपर्यंत पाटील यांनी ‘वेट ॲण्ड वॉच’ची भूमिका घेतली. मागील महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूरमध्ये झालेल्या कार्यक्रमात आमदार दत्तात्रय भरणे यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले होते. त्यानंतर पाटील यांच्या राजकीय हालचालींना वेग आला. भाजपमधीलच ज्येष्ठ मंडळींनीही हर्षवर्धन पाटील पक्ष सोडू शकतात, असे संकेत दिले होते.
ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खा.सुप्रिया सुळे यांच्याबरोबर तासभर चर्चा झाली. आपण शरद पवार गटात यावे यासाठी त्यांच्याकडून आग्रह करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी इंदापूरमधील दूधगंगा दूध उत्पादक संघाच्या सभागृहात मी कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करणार आहे. - हर्षवर्धन पाटील, भाजप नेते