मुंबई - राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील जनता त्रस्त असताना राजकीय नेत्यांचा मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीगाठींचा धडका सुरू आहे. काँग्रेसनेते आणि माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या मदतीची परतफेड करावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाला सामोरे जावे लागले. दिग्गज नेते अशोक चव्हाण यांना नांदेडमधून पराभव पत्करावा लागला. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या देखील पराभवाच्या छायेत असल्याचे बोलले जाते होते. परंतु, सुळे यांनी आपला गड राखला. किंबहुना सुळे यांच्या विजयासाठी राष्ट्रवादीने सर्व शक्तीपणाला लावली होती. विरोधकांसह मित्रपक्षाकडून मदत मिळवली. सुप्रिया सुळेंच्या विजयासाठी सर्वाधिक मदत हर्षवर्धन पाटील यांनीच केली. त्यांनी सुळे यांना इंदापूरमधून मोठी आघाडी मिळवून दिली होती.
अनेकांनी सुळे यांच्या पराभवाची शक्यता व्यक्त केली होती. परंतु, सुळे यांनी २०१४ पेक्षा २०१९ मध्ये अधिक आघाडी मिळवली. दोन मतदारसंघ वगळता त्यांना इतर मतदार संघात आघाडी मिळाली. इंदापूरमध्ये सध्या राष्ट्रवादी पक्षाचे आमदार आहेत. परंतु, इंदापूर पुन्हा काँग्रेसला मिळेल या आशेने हर्षवर्धन यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी त्यांनी भेटीगाठींचा धडाका सुरू केला आहे.
२०१४ मध्ये स्वतंत्र लढलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे काही मतदारसंघ एक्सचेंज झाले. इंदापूरमधून दत्तात्रय भरणे विजयी झाले. तर हर्षवर्धन यांचा पराभव झाला. परंतु, २०१९ मध्ये आघाडी होणार असून हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसला मिळेल या आशेने पाटील काम करत आहे. पाटील यांनी केवळ मतदार संघ मिळून भागणार नसल्याचे सांगत राष्ट्रवादीला लोकसभा निवडणुकीत केलेल्या मदतीची आठवण करून दिली. तसेच केवळ मतदार संघ नव्हे तर राष्ट्रवादीने पूर्ण ताकदीने आघाडी धर्म पाळावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.