औरंगाबाद - कन्नड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. मध्यरात्री दोनच्या सुमारास जाधव यांच्या घरावर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला. तसेच त्यांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.
यावेळी हर्षवर्धन जाधव म्हणाले, "काल जो रात्री माझ्या घरावर हल्ला झाला, तो म्हणजे उत्तम नामर्दानगीचे उदाहरण होतं. माझी मिसेस, माझा मुलगा एकटे माझ्या घरी होते आणि अशा स्थितीत रात्री दोन वाजता येऊन माझ्या घरावर दडफेक करणं, गाडीच्या काचा फोडणं हा प्रकार घडला. मला असं वाटतं की शिवसेनेनं स्वत:चं आत्मपरीक्षण केलं पाहिजे, कारण लोकसभेच्या निवडणुकीनंतर चंद्रकांत खैरेंनी स्टेटमेंट दिलं होतं की हर्षवर्धन जाधव यांनी त्यांच्या वडिलांचा खून केला. मला असं वाटतं की त्यावेळेला चंद्रकांत खैरेंची मनस्थिती ठिक नसल्यामुळं तशा प्रकारचं त्यांच्याकडून विधान निघाले असावं, असं मी ग्रह केला. त्यामुळे मी त्याठिकाणी प्रतिकार केला नव्हता पण, आता मात्र दररोज जर माझ्यावर म्हणत असतील की मुसलमानाची औलाद आहे, तर शेवटी कुठतरी मी पण माणूस आहे आणि माझी सुद्धा प्रतिक्रिया निघाली. आता माझी प्रतिक्रिया निघाल्यानंतर फक्त शिवसेना एक मोठा पक्ष आहे. महाराष्ट्राभर त्यांच्या शाखा आहेत, म्हणून अंगावर यायचं, अशा पद्धतीचं काम जर शिवसेनेचं लोक करत असतील तर मला असं वाटतंय दुर्देवी आहे. पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप केला नाही तर अशा स्थितीमध्ये त्याठिकाणी शिवसेना महाराष्ट्रभर आंदोलन करू शकते आणि माझ्याबद्दल दुराग्रह करू शकते, तर याचा प्रतिकारही मला त्याठिकाणी करावाचं लागेल."
दरम्यान, हर्षवर्धन जाधव हे कन्नडचे माजी आमदार असून यावेळी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना हर्षवर्धन जाधव यांची जीभ घसरली होती. त्यावेळी जर, मी निवडणूक लढवून मुस्लीम उमेदवाराला मदत केल्याचा तुम्हाला राग आला, तर मग अब्दुल सत्तार तुमचा कोण? असा सवाल हर्षवर्धन जाधव यांनी केला होता. मात्र त्याचवेळी त्यांनी आक्षेपार्ह विधानही केले.
हर्षवर्धन जाधव यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंचा पराभव झाल्याचे मानले जाते. कन्नडमधील एक विश्वासघातकी, ज्यानं भगवा उतरविण्यामध्ये हिरव्याची साथ दिली होती, त्याला आता अजिबात माफी नाही. चुकतोय, लहान म्हणून मी चुका पोटात घालत होतो. पण, भगव्याशी हरामखोरी मी सहन करू शकत नाही, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले होते.