राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाच्या संचालकपदी हर्षवर्धन पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 19:23 IST2019-07-24T19:23:00+5:302019-07-24T19:23:14+5:30
नवी दिल्ली येथे देशातील सहकारी साखर कारखान्यांची राष्ट्रीय पातळीवरील काम करणारी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ ही महत्त्वाची प्रमुख संस्था आहे.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाच्या संचालकपदी हर्षवर्धन पाटील
इंदापूर : महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांची नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाच्या (एनएफसीएसएफ) संचालकपदी मंगळवारी (दि. २३ ) रोजी निवड करण्यात आली. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांना संचालकपदी निवड झाल्याचे नियुक्ती पत्र दिले.
देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे या निवडीसाठी पाटील यांना सहकार्य लाभले. नवी दिल्ली येथे देशातील सहकारी साखर कारखान्यांची राष्ट्रीय पातळीवरील काम करणारी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ ही महत्त्वाची प्रमुख संस्था आहे. देशातील साखर उद्योगाला मार्गदर्शन करणे, तसेच साखर उद्योगांपुढील अडचणी केंद्र सरकारकडून सोडवून घेण्याचे काम राष्ट्रीय साखर कारखाना संघाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
राज्याचे सहकार खाते हर्षवर्धन पाटील यांनी अनेक वर्षे प्रभावीपणे सांभाळले आहे. राज्यातील साखर उद्योगातील अभ्यासू नेते म्हणून राज्यात हर्षवर्धन पाटील काम करीत आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना महासंघ मुंबई तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुक या राज्यातील साखर उद्योगातील दोन प्रमुख संस्थांचे संचालक म्हणूनही सध्या हर्षवर्धन पाटील कामकाज पाहत आहेत. राष्ट्रीय पातळीवर निवड झाल्याबद्दल इंदापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष भरत शहा, राज्य साखर संघाचे तज्ज्ञ संचालक मंगेश पाटील, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मेघश्याम पाटील, युवा नेते महेंद्र रेडके आदींनी पाटील यांचे अभिनंदन केले .