इंदापूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला असून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि. ११) मुंबई येथे दुपारी ३ वाजता पाटील यांचा भाजप प्रवेश होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना यानिमित्ताने पूर्ण विराम मिळाला आहे.या प्रवेश सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील उपस्थित राहणार आहे. पाटील यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसचा पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एक बुरूज ढासळला असून आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला मोठा धक्का बसल्याचे मानण्यात येत आहे. इंदापूर विधानसभा मतदार संघांचे पाटील यांनी सलग ४ वेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. यामध्ये सलग ३ वेळा अपक्ष आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम देखील पाटील यांच्या नावावर आहे. मुख्यमंत्रीमनोहर जोशी व उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या युती शासनात ५ वर्षे व त्यानंतर आघाडी शासनात सलग १४ वर्षे मंत्री म्हणून काम केले आहे. त्यांनी एकूण ६ मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केलेआहे. पाटील यांच्या भाजप प्रवेशाने आजपर्यंत इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस व हर्षवर्धन पाटील यांच्या सुप्त संघर्षाला धार चढणार असून तालुक्यातील राजकिय परिस्थितीलाही वेगळे वळण मिळणार आहे.