राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा करताच हर्षवर्धन पाटलांचा जुना व्हिडिओ व्हायरल, काय म्हटलंय?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 09:59 AM2024-10-05T09:59:14+5:302024-10-05T10:01:32+5:30
हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाला रामराम करत येत्या ७ ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे - विधानसभा निवडणुकीची घोषणा पुढील काही दिवसांत होण्याची शक्यता आहे. मात्र तत्पूर्वीच भाजपाला पश्चिम महाराष्ट्रात एका पाठोपाठ एक धक्के बसत आहेत. कागलमध्ये समरजितसिंह घाटगे यांच्यानंतर इंदापूरमधीलभाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपातून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. ७ तारखेला शरद पवारांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटलांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. मात्र या प्रवेशापूर्वी हर्षवर्धन पाटलांचा जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलणाऱ्या नेत्यांवर भाष्य केले आहे.
एका जुन्या मुलाखतीत हर्षवर्धन पाटील म्हणतात की, असे जे दलबदलू असतात, स्वार्थासाठी निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलतात. ज्या पक्षात जातात त्यावर फारसं प्रेम आहे म्हणून नाही तर त्यांचा स्वार्थ त्यामागे असतो. असे जे आयाराम गयाराम असतात निवडणूक आली की त्यांची खूप चलती असते. बऱ्याचवेळा आयाराम गयारामच पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे यांना जनता योग्य उत्तर देईल असं विधान त्यांनी केले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत असून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी हा व्हिडिओ ट्विट करत त्यावर आयाराम की गयाराम? सहज विचारलं असं कॅप्शन देत हर्षवर्धन पाटलांना चिमटा काढला आहे.
आयाराम की गयाराम? सहज विचारलं 😄 pic.twitter.com/BjFWhWtE2g
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) October 4, 2024
इंदापूरच्या जागेवरून सोडला पक्ष
महायुतीत इंदापूरची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जाणार आहे. याठिकाणी विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे दादा गटासोबत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा भरणे यांनाच उमेदवारी दिली जाईल या शक्यतेने हर्षवर्धन पाटील नाराज होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते भाजपा सोडणार अशी चर्चा होती. अखेर शुक्रवारी हर्षवर्धन पाटील यांनी त्याबाबत समर्थकांचा मेळावा घेऊन घोषणा केली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून तुतारी चिन्हावर आगामी इंदापूरची निवडणूक लढवण्याची तयारी हर्षवर्धन पाटलांनी केली आहे.
दरम्यान, इंदापूरची राजकीय परिस्थिती जी आहे, त्याप्रमाणे हर्षवर्धन पाटील यांनी निर्णय घेतला असेल. तो मतदार संघ अजित पवार यांचे निकटवर्तीय सध्या तिथे आमदार आहेत. त्यामुळे स्वाभाविक आहे, तिकडे भाजपाला जागा मिळणे कठीण आहे. त्यामुळे हर्षवर्धन यांनी हा निर्णय घेतला असावा अशी प्रतिक्रिया भाजपा खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे.