चार वर्षे सरकारवर टीका करणारे हर्षवर्धन पाटील करणार 'महाजनादेश'चे स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 12:58 PM2019-09-14T12:58:01+5:302019-09-14T13:07:40+5:30
भाजपच्या तिसऱ्या टप्प्यातील महाजनादेश यात्रेला शुक्रवारपासून सुरुवात झाली असून आज यात्रा इंदापूर तालुक्यात दाखल होणार आहे. यावेळी हर्षवर्धन पाटील यात्रेचे स्वागत करणार आहेत.
मुंबई - राजकारणातील पक्षांतरामुळे कार्यकर्त्यांची मोठी अडचण झाली आहे. सकाळी पक्षात असलेले आपले नेते संध्याकाळी कोणत्या पक्षात दिसेल याचा अंदाज लावणे कार्यकर्त्यांना कठिण झाले आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षातील नेत्यांनी सत्ताधारी भाजप-शिवसेनेत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यातील जागेच्या पेचामुळे काँग्रेसनेते हर्षवर्धन पाटील देखील भाजपमध्ये सामील झाले आहेत. सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाजनादेश यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेचे इंदापुरात हर्षवर्धन पाटील स्वागत करणार आहेत.
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. इंदापूरची जागा राष्ट्रवादी सोडणार नाही, हे स्पष्ट झाल्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. पाटील यांना शेवटपर्यंत इंदापूरची जागा काँग्रेसला मिळेल अशी आशा होती. त्यासाठी त्यांनी तयारीही केली होती. मात्र त्यांच्या हाती निराशाच आली.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचे कामही केले होते. त्यामुळे सुळे यांना इंदापूरमधून मोठी आघाडी मिळाली होती. त्यानंतर इंदापूरची जागा आघाडीत काँग्रेसला देण्यात येईल असा अंदाज पाटील यांना होता. त्यानुसार मागील चार वर्षे पाटील काँग्रेसकडून सक्रिय होते. तसेच त्यांनी अनेकदा सरकारच्या धोरणांवर आणि मुख्यमंत्र्यांवर देखील टीका केली होती. मात्र आता टीका करणारे हर्षवर्धन पाटीलच भाजपमध्ये सामील झाले असून ज्यांच्या धोरणांवर टीका केली, त्यांचंच स्वागत इंदापूरमध्ये करणार आहेत.
भाजपच्या तिसऱ्या टप्प्यातील महाजनादेश यात्रेला शुक्रवारपासून सुरुवात झाली असून आज यात्रा इंदापूर तालुक्यात दाखल होणार आहे. यावेळी हर्षवर्धन पाटील यात्रेचे स्वागत करणार आहेत.