पुणे : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीने आतापासूनच तयारी सुरु केली आहे. अशातच महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच पाहायला मिळणार असल्याचे दिसून येते. दरम्यान, महायुतीमध्ये मात्र आतापासूनच जागावाटपावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या वादाची ठिणगी इंदापूर विधानसभेवरून होणार असल्याचं चित्र आहे.
सध्या इंदापूर विधानसभेचं नेतृत्व अजित पवार गटाचे दत्ता भरणे करत आहेत. गेल्या निवडणुकीत दत्ता भरणे यांनी भाजपच्या हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता. आता दत्ता भरणे आणि हर्षवर्धन पाटील हे महायुतीत आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटील हे महायुतीतून लढण्यास उत्सुक आहेत. यावर हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी भाष्य केलं आहे. त्या म्हणाल्या, काहीही झालं तरी यावेळी हर्षवर्धन पाटील हे निवडणूक लढवणारच, ती कशी लढायची, यावर आताच काही बोलणार नाही. मात्र, निवडणूक लढवण्यावर ठाम आहोत, असं अंकिता पाटील यांनी सांगितलं.
अंकिता पाटील म्हणाल्या की, इंदापूरचा कार्यकर्ता आमचा श्वास आहे. अद्यापपर्यंत आम्ही कोणताही निर्णय घेतला नाही. तीन वेळा आमच्यावर अन्याय झाला. जागा वाटपाचा निर्णयात आतापर्यंत झालं नाही. जागावटपात काय होतंय हे महत्त्वाचा आहे. इंदापूर तालुका २०१४ पर्यंत प्रगतीपथावरचा तालुका होता, आता तालुका वीस वर्षे मागे गेला आहे. या ठिकाणच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला, कोणतीही डेव्हलपमेंट झाली नाही. गुन्हेगारी वाढली आहे. हर्षवर्धन पाटील विधानसभा निवडणूक लढवणार १०० टक्के निश्चित. ते कसे लढतील यावर बोलणार नाही, पण आम्ही विधानसभा निवडणूक लढणार, असं अंकिता पाटील म्हणाल्या.
कार्यकर्त्यांवर अन्याय झालाय - हर्षवर्धन पाटीलहर्षवर्धन पाटील म्हणाले की, "लोकसभेच्या निवडणुकीवेळी मी, आमचे नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विस्ताराने चर्चा केली होती. त्यावेळेला असं ठरलं की, देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल. मात्र, निर्णयापर्यंत ती प्रक्रिया आलेली नाही. मला वाटतंय लोकसभेवेळी जी चर्चा झाली. त्याबाबतची स्पष्टता जागा वाटपावेळी होईल. महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. आमची कोअर कमिटीची बैठक झाली. त्यामध्ये महायुती होणार यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. मात्र, कोणत्या जागा कोणाला जाणार? याबाबत आमचे वरिष्ठ नेते चर्चा करतील. केंद्रीय नेतृत्व याबाबत चर्चा करेल. त्यामुळे जागा वाटपासंदर्भात अंतिम प्रक्रिया झालेली नाही. सध्या निवडणुकीचं वातावरण सुरु झाल आहे. आमच्या कार्यकर्त्यांची संख्या फार मोठी आहे. गेल्या काही वर्षात कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे."