मागण्या मान्य : १२ पासून भूमी अभिलेखचा संपनागपूर : निवडणुकीच्या तोंडावर सरकारची कोंडी करून कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्या पदरी पाडून घेतल्याने सध्या तरी त्यांना सुगीचे दिवस आल्याचे चित्र आहे. ग्रामविकास अधिकाऱ्याच्या वेतन श्रेणीत सुधारणा करण्यात आली तर सहा दिवस संप करून महसूल कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सहा मागण्या मान्य करून घेतल्या. आता १२ तारखेपासून भूमिअभिलेख कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप आहे. त्यांनाही शासन निराश करणार नाही, अशी कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा आहे.निवडणुका जवळ आल्यावर सत्तेत असलेल्या पक्षाचे सरकार लोकप्रिय घोषणा करून लोकांची मने जिंकण्याचा प्रयत्न करते. सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीतही उदार धोरण ठेवण्यात येते. लोकसभा निवडणुकीच्या वेळी केंद्र आणि राज्य सरकारने अशाच प्रकारच्या घोषणा केल्या होत्या. मात्र निवडणुकीत त्यांच्या पदरी निराशा आली. किमान विधानसभेच्या निवडणुकीत तरी जनता आणि कर्मचाऱ्यांच्या नाराजीचा फटका बसू नये म्हणून सरकारकडून पावले उचलली जात आहे. १६ टक्के आरक्षण देऊन मराठा समाजाला खूश करण्यात आले. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी संपाचे इशारे दिले. काहीनी आंदोलने केली आणि त्यांना आश्वासने मिळाली. त्याची पूर्तता करणे सध्या सुरू आहे. ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांच्या वेतनश्रेणीत बुधवारी सरकारने सुधारणा केली. सरपंचाच्या मानधनात आणि ग्राम पंचायत सदस्यांच्या बैठक भत्त्यात वाढ करण्यात आली. महसूल कर्मचाऱ्यांना गतवर्षी दिलेल्या आश्वासनांची पूर्ती निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आली. त्यांना त्यासाठी सहा दिवसांचा संप करावा लागला. शिपायांना आता सायकलऐवजी मोटरसायकलसाठी अग्रिम दिला जाणार आहे. नायब तहसीलदारांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्यात आली आहे. संप केल्याने मागण्या मान्य होतात हा संदेश महसूल कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातून गेल्याने पुढच्या काळात आणखी काही संघटना अशाच प्रकारचे पाऊल उचलण्याची शक्यता आहे. १२ आॅगस्टपासून भूमी अभिलेख कर्मचारी संपावर जात आहेत. तांत्रिक वेतन श्रेणीसाठी त्यांचे आंदोलन आहे.दरम्यान महसूल कर्मचाऱ्यांच्या संप काळात ९० टक्के कर्मचाऱ्यांचा सहभाग असला तरी मोजकेच कर्मचारी आंदोलनात सहभागी होते. इतरांनी सुटीचा आनंद घेतला. शनिवार, रविवार पुन्हा सुटी आहेच. एकूणच निवडणुकीपूर्वी कर्मचाऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत. (प्रतिनिधी)
कर्मचाऱ्यांना सुगीचे दिन
By admin | Published: August 08, 2014 1:06 AM