हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 08:32 PM2024-10-08T20:32:00+5:302024-10-08T20:38:05+5:30
Haryana Assembly Election 2024: हरयाणातील अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये विजयी आणी पराभूत उमेदवारांमधील जय परायजामधील अंतर फारच कमी राहिलं आहे. त्यात उचाना कलां विधानसभा मतदारसंघात तर अत्यंत रोमांचक लढत पाहायला मिळाली.
हरयाणा विधानसभा निवडणुकीतचे निकाल हे अनेकांसाठी धक्कादायक असे ठरले आहे. येथे झालेल्या अटीतटीच्या मुकाबल्यामध्ये काँग्रेसला पराभवाचा धक्का देत भाजपाने ४८ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. दरम्यान, हरयाणातील अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये विजयी आणी पराभूत उमेदवारांमधील जय परायजामधील अंतर फारच कमी राहिलं आहे. त्यात उचाना कलां विधानसभा मतदारसंघात तर अत्यंत रोमांचक लढत पाहायला मिळाली. येथे अवघ्या ३२ मतांनी जय-पराजयाचा फैसला झाला. धक्कादायक बाब म्हणजे हरयाणाचं उपमुख्यमंत्रिपद भूषवणाऱ्या दुष्यंत चौटाला यांचा येथे दारुण पराभव झाला. त्यांना पाचव्या स्थानावर राहावे लागले.
माजी उपमुख्यमंत्री आणि जननायक जनता पार्टीचे प्रमुख दुष्यंत चौटाला लढत असल्याने उचाना कलां मतदारसंघावर राजकीय वर्तुळाची नजर होती. मात्र येथे दुष्यंत चौटाला यांना मतदारांनी अजिबातच प्रतिसाद दिला नाही. या मतदारसंघात भाजपाचे देवेंद्र चतुरभूज अत्री आणि काँग्रेसचे बृजेंद्र सिंह यांच्यात अटीतटीची लढत झाली. अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या मुकाबल्यामध्ये अखेरीस भाजपाच्या देवेंद्र अत्री यांनी अवघ्या ३२ मतांनी विजय मिळवला.
जिंद जिल्ह्यातील उचाना कलां या मतदासंघात दुष्यंत चौटाला यांच्यासमोर काँग्रेसचे बृजेंद्र चौधरी, भाजपाचे देवेंत्र अत्री यांच्यासह इतर अपक्ष उमेदवारांचेही आव्हान होते. त्यामुळे येथील लढत अटीतटीची होण्याचे संकेत मिळत होते. मतमोजणीमध्येही येथे त्याचा प्रत्यय येत होता. मात्र अखेरीच भाजपाचे देवेंद्र अत्री आणि काँग्रेसचे बृजेंद्र सिंह हे मुख्य लढतीमध्ये उरले. अगदीच अटीतटीचा सामना असल्याने दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापटही होत होती. बराचवेळ गोंधळही झाला. मात्र शेवटी निकाल जाहीर करण्यात आला.
या निकालांनुसार उचाना कलां विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या भाजपाच्या देवेंद्र चतुरभूज अत्री यांनी ४८ हजार ९६८ मतं मिळाली. तर काँग्रेसच्या बृजेंद्र सिंह यांना ४८ हजार ९३६ मतं मिळाली. तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले अपक्ष उमेदवार विजेंद्र घोघरियान यांना ३१ हजार ४५६ मतं मिळाली. चौथ्या क्रमांकावर राहिलेले अपक्ष उमेदवार विकास यांना १३ हजार ४५८ मतं मिळाली. तर माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला हे पाचव्या क्रमांकावर फेकले गेले. त्यांना अवघी ७ हजार ९५० मतं मिळाली.