हरियाणा निकालाचे पडसाद महाराष्ट्रात; उद्धव ठाकरे आक्रमक, "CM पदाचा चेहरा.."
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 05:36 PM2024-10-08T17:36:37+5:302024-10-08T17:38:26+5:30
उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाचा सूर आवळला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सातत्याने ठाकरेंच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
मुंबई - हरियाणा विधानसभा निकालाचे कल समोर आल्यानंतर महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. हरियाणात भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवलं असून काँग्रेसला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे राज्यात काँग्रेसवर दबाव वाढवण्यासाठी ठाकरेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची आग्रही मागणी केली आहे. माझ्यासाठी महाराष्ट्र महत्त्वाचा, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी दोघांनी कुणाचेही नाव मुख्यमंत्रिपदासाठी जाहीर करावे मी त्याला पाठिंबा द्यायला तयार आहे असं विधान उद्धव ठाकरेंनी केले आहे. मुंबईत झालेल्या राज्यव्यापी वज्र निर्धार परिषदेत ठाकरे बोलत होते.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, दीड महिन्यापूर्वी षण्मुखानंद हॉलमध्ये महाविकास आघाडीचा जो कार्यक्रम झाला तेव्हा जाहीर केले तेच सांगतो. काँग्रेस किंवा राष्ट्रवादीने कुणाचेही नाव मुख्यमंत्रिपदासाठी जाहीर करावे, मी त्याला पाठिंबा द्यायला तयार आहे. मुळात मला माझा महाराष्ट्र प्यारा आहे, मला महाराष्ट्राचं हित साधायचं आहे. मला मुख्यमंत्री बनायचंय अशी माझ्या डोक्यात वेडीवाकडी स्वप्न पडत नाही. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन म्हणत नाही. महाराष्ट्र वाचवण्यासाठी जे जे काही करायचं असेल ते केल्याशिवाय मी राहणार नाही, हा माझा निर्धार आहे. त्याच्या आड कुणी काळ्या मांजरासारखं येणार असेल तर त्यांच्या पेकाटात लाथ घालणार नाही असं समजू नये, मला घालावीच लागेल असा इशाराही त्यांनी दिला.
तसेच आपण जो वज्र निर्धार केलाय तो फार महत्त्वाचा आहे. तुमच्या सामाजिक संस्था स्वार्थी नाही, आपला स्वार्थ एकच माझा महाराष्ट्र आणि माझ्या महाराष्ट्राच्या पुढच्या पिढ्या या स्वाभिमानाने जगल्या पाहिजे. या २ ठगांच्या गुलामगिरीत जगू देणार नाही हा वज्र निर्धार आपला असला पाहिजे. आम्ही गुलामी पत्करणार नाही. हिंदुत्व हे हिंदुत्वच आहे, काळानुसार त्यात भूमिका घ्याव्या लागतात. मला देवळात बडवणारा हिंदू नको हे माझे नाही बाळासाहेब ठाकरेंचं वक्तव्य आहे. बुरसटलेल्या परंपरेत हिंदू समाज अडकला होता ते माझ्या वडिलांनाही मान्य नव्हते. बुरसटलेले हिंदुत्ववादी यांच्याविरोधात प्रबोधनकार ठाकरे लढले. जो लढा आंबेडकरांनी दिला तसाच लढा माझ्या आजोबांनी दिला. नंतर शिवसेनाप्रमुखांचा काळ आला. भाजपाने जे वातावरण तयार केले त्या वातावरणातून बाहेर ते आपल्याला आणू इच्छित नाही असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.
दरम्यान, शिवसेनाप्रमुखांच्या काळात हिंदू मुस्लीम वाद होता, तेव्हा समाज सुधारणेचे मुद्दे बाजूला पडले. आता मी भाजपाला सोडले म्हणून हिंदुत्व सोडलं नाही, सोडणार नाही. भाजपाचं जे हिंदुत्वाचे थोतांड होते, त्यापासून मी बाजूला झालो आहे. हिंदुत्व कुणावरही अन्याय करणारे नाही. निवडणुकीपर्यंत सबका साथ आणि निवडणुकीनंतर मित्रांना साथ हे मोदींसारखे आमचे हिंदुत्व नाही. ज्या शिवसेनेने तुम्हाला कठीण काळात साथ दिली, सोबत दिली, सत्ता नव्हती, आमदार निवडून येत नव्हते. आज राज्यात आमदार निवडून आले, पंतप्रधान झाले. कठीण काळात आम्ही भाजपाला साथ दिली. आज ते माढीवर चढले आणि आम्हाला लाथा घालायला लागले. हा आत्ममतलबीपणा आहे तो आपल्याला नाही तर संपूर्ण देशाला घातक आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.