डिप्पी वांकाणी, मुंबई हरियाणात आठ खुनांसह एकूण ३६ प्रकरणांत हवा असलेला नामचीन गुंड संदीप गदोली (रा. गुडगाव) रविवारी सकाळी अंधेरीतील एका हॉटेलात तेथील पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाला. या वेळी गदोलीने केलेल्या गोळीबारात हरियाणाचे दोन पोलीस जखमी झाले. गदोलीवर १.२५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर झालेले होते. गुडगाव गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता परस्पर ही कारवाई केली, असे मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र मुंबई पोलिसांना आम्ही या कारवाईची आधीच माहिती दिली होती, असा दावा गुडगाव पोलिसांनी केला. दरम्यान, मुंबईचे पोलीस आयुक्त दत्तात्रेय पडसलगीकर यांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास रविवारी रात्री गुन्हे शाखेकडे सोपविला.गुडगावचे पोलीस निरीक्षक अमित कौहर यांनी सांगितले की, सकाळी ११च्या सुमारास गुडगाव गुन्हे शाखेच्या पोलिसांची आठ जणांची तुकडी अंधेरीत (पूर्व) एमआयडीसीतील एअरपोर्ट मेट्रो हॉटेलमध्ये गेली. आम्ही गदोलीच्या शोधात अगदी गुडगावपासून होतो. शुक्रवारी आधी आम्ही भिवंडीत गेलो. तेथे आम्हाला तो जयपूरला गेल्याचे कळाले. तेथे आम्हाला तो मुंबईत असल्याची निश्चित माहिती समजली. त्यानुसार आम्ही त्याला हॉटेलमध्ये अटक करण्याची तयारी केली होती. गदोलीने पळून जाण्याचा प्रयत्न केला तर लगेच पकडता यावे यासाठी आमच्यापैकी तिघे जण हॉटेल परिसरात लक्ष ठेवून होते. एके-४७, पिस्तुले आणि रिव्हॉल्व्हरसह आमच्या तुकडीतील पाच जण हॉटेलच्या तळमजल्यावरील खोलीकडे गेले. गदोली तेथे एका मुलीसह होता. त्याने दार उघडले व आमचे लोक बघताच त्याने जबरदस्तीने दार लावण्याचा प्रयत्न केला व त्यांच्या दिशेने त्याने गोळ्याही झाडल्या. त्यातील एक गोळी पोलीस शिपाई परमजितच्या (४०) कानशिलाला खेटून गेली. दुसरी गोळी शिपाई विक्रमसिंग (३०) याच्या पायाला लागली. कौहर म्हणाले की, आमच्या पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात गदोली जखमी झाला. त्याला कूपर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले तेथे दुपारी १२.५५ च्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्याच हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरील जयपूरहून गदोलीसोबत आलेले त्याचे दोन मित्र व दोन विदेशी मुलींसह राहात होते. या कारवाईची माहिती आम्ही स्थानिक पोलिसांना दिली होती, असेही कौहर म्हणाले.अमित कौहर म्हणाले की,‘‘संदीप गदोलीने हॉटेलमध्ये राहण्यासाठी रिषभ सिंगच्या नावाने बनावट ओळखपत्र बनवून खोली बुक केली होती. आम्ही त्याची स्कॉर्पियो कार (एचआर-२६ सीजे ५८९५) हॉटेलच्या कुंपणाच्या आता उभी केलेली बघितली होती. आमची माहिती योग्य होती हे निश्चित झाल्यावर आम्ही सशस्त्र होऊन हॉटेलमध्ये गेलो.’’मुंबई पोलिसांच्या विभाग १० चे उपायुक्त विनायक देशमुख यांनी सांगितले की,गुडगाव पोलिसांच्या तक्रारीवरून खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा आम्ही संदीप गदोलीविरुद्ध दाखल केला आहे. आम्ही हॉटेलमधील त्याच्या खोलीतून पिस्तूल आणि काही रोख रक्कम ताब्यात घेतली आहे. अशा कारवाईची माहिती त्यांनी आम्हाला आधीच द्यायला हवी होती परंतु त्यांनी तसे केले नाही. नियंत्रण कक्षाला कळविल्याचे ते सांगत असले तरी त्याची आम्ही खातरजमा करून घेत आहोत. आम्ही त्या मुली आणि त्याच्या साथीदारांचे म्हणणेही नोंदवून घेत आहोत. आम्ही हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले आहे.सलग तीन दिवस प्रवासआपण भिंवडीतच त्याला अटक करू असा विचार गुडगाव पोलिसांनी केला होता. त्यामुळे मागचे दार जाळीचे असलेल्या कारने ते प्रवास करीत होते. हॉटेलवर छापा घातलेल्या तुकडीतील पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की आम्ही सलग तीन दिवस प्रवास करीत होतो व तरीही आम्ही मुंबईला पोहोचू, असे वाटले नव्हते.तीन खोल्यांची बुकिंगसंदीप गदोली आणि त्याच्या साथीदारांनी एअरपोर्ट मेट्रो स्टेशनजवळील हॉटेलमध्ये तीन खोल्या बुक केल्या होत्या. या हॉटेल्समध्ये विदेशी लोकांनीही खोल्या बुक केल्या होत्या.