"महापुरुषांचा अपमान करण्याचे लायसन भाजपाने संभाजी भिडे यांना दिले आहे का?", नाना पटोले यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 02:36 PM2023-08-02T14:36:15+5:302023-08-02T14:38:04+5:30
Nana Patole Criticize BJP: महापुरुषांचा अपमान करण्याचे लायसन भाजपाने संभाजी भिडे यांना दिले आहे का ? असा संतप्त सवाल करत भिडे यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीवर काँग्रेस पक्ष ठाम आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबई - मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे हे राजरोस महापुरुषांचा अपमान करत आहेत, परंतु भाजपाचे सरकार त्यांच्यावर कारवाई करत नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा जोतीबा फुले, सावित्रीबाई फुले, साईबाबा यांच्यासंदर्भात गरळ ओकणारे भिडे नावाचे व्यक्ती अजून मोकाटच आहेत. महापुरुषांचा अपमान करण्याचे लायसन भाजपाने संभाजी भिडे यांना दिले आहे का ? असा संतप्त सवाल करत भिडे यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीवर काँग्रेस पक्ष ठाम आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.
विधान भवन परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे सरकार संभाजी भिडे यांना पाठीशी घालत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संभाजी भिडेंचा उल्लेख गुरुजी असा करतात, भिडेंना पोलिसांचे मोठे संरक्षण दिलेले आहे, सत्ताधारी भाजपला हे भिडे एवढे मोठे वाटतात का? संभाजी भिडेंचे सहकारी ज्यांना धारकरी म्हणतात ते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी मंत्री आ. यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी देतात. लोकांना जीवे मारण्याचे हे कसले हिंदुत्व, हे हिंदुत्व फडणवीस यांना मान्य आहे का? भाजपाचे खायचे दात व दाखवायचे दात वेगळे आहेत.
महाराष्ट्र हा शिव, शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचाराचा आहे, या राज्यात भाजपा संभाजी भिडेंसारख्या व्यक्तींना पुढे करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपाला महाराष्ट्राचा मणिपूर करायचा आहे, याचा पुनरुच्चार पटोले यांनी केला. भाजपा पेटवण्याचा प्रयत्न करत असला तरी राज्यातील जनता मात्र अशा षडयंत्राला बळी पडणार नाही, असेही नाना पटोले यांनी सांगितले.