मुख्यमंत्र्यांचे ‘वर्षा’ निवासस्थान गुन्हेगारांसाठी पर्यटनस्थळ झालेय का? एल्विस यादववरून काँग्रेसचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 04:28 PM2023-11-03T16:28:50+5:302023-11-03T16:29:25+5:30

Congress Criticize CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचा शासकीय ‘वर्षा’ बंगलाच जर गुंडांना ‘अतिथि देवो भव’ म्हणत असेल तर ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?’ असाच प्रश्न पडतो, असेही काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले.

Has the Chief Minister's 'Varsha' residence become a tourist spot for criminals? Congress question on Elvis Yadav | मुख्यमंत्र्यांचे ‘वर्षा’ निवासस्थान गुन्हेगारांसाठी पर्यटनस्थळ झालेय का? एल्विस यादववरून काँग्रेसचा सवाल

मुख्यमंत्र्यांचे ‘वर्षा’ निवासस्थान गुन्हेगारांसाठी पर्यटनस्थळ झालेय का? एल्विस यादववरून काँग्रेसचा सवाल

मुंबई - मुख्यमंत्र्यांचे सरकारी निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्यावर सर्वसामान्य लोकांना प्रवेश मिळणे मुश्कील असते. वर्षा वर प्रवेश देताना विविध पातळ्यांवर सुरक्षेची तपासणी केली जाते. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात वर्षावर गुंडांना सहज प्रवेश मिळत असल्याचे दिसते. सापांच्या विषाच्या रेव्ह पार्ट्या आयोजित करणाऱ्या एल्विस यादव सारख्या टुकार युट्युबरला विशेष आमंत्रण देऊन ‘वर्षा’वरील गणपती आरतीला बोलावल्याचे उघड झाले आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.

यासंदर्भात अतुल लोंढे पुढे म्हणाले की, विषारी रेव्ह पार्टी आयोजित केल्याप्रकरणी नोएडा पोलिसांनी एल्विस यादव आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा नोंद केला असून, त्यांच्याकडे जिवंत विषारी साप सापडले आहेत. नोएडाच्या पोलिसांना एल्विस यादव रेव्ह पार्ट्या आयोजित करतो याचा छडा लागला, पण मुंबई अथवा महाराष्ट्र पोलीसांना एल्विसच्या काळ्या कृत्यांची माहिती नव्हती असे म्हणता येईल का? एल्विसची पार्श्वभूमी गुन्हेगारी प्रवृत्तीची असताना त्याची खबर पोलिसांनी नसावी आणि मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवास्थानी तो मुख्यंमत्र्यांचा पाहुणा म्हणून विशेष सन्मान दिला जातो हे आश्चर्यकारक आहे. एल्विस यादवला ‘वर्षा’वर कोणाच्या सांगण्यावरून विशेष सन्मान मिळाला, हे महाराष्ट्राला समजले पाहिजे, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने अतुल लोंढे यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पुण्यातील कुख्यात गुंड बाबा बोडकेचे ‘वर्षा’ बंगल्यावरील फोटो झळकले होते. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरच गुंडांना विशेष पाहुणा म्हणून मान सन्मान मिळत असेल तर पोलीस विभाग तर काय करणार? पण हे अत्यंत गंभीर असून, या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांचा शासकीय ‘वर्षा’ बंगलाच जर गुंडांना ‘अतिथि देवो भव’ म्हणत असेल तर ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?’ असाच प्रश्न पडतो असेही अतुल लोंढे म्हणाले.

Web Title: Has the Chief Minister's 'Varsha' residence become a tourist spot for criminals? Congress question on Elvis Yadav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.