Maharashtra Latest News: विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर दिल्ली आणि मुंबईत बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली. पण, या बैठकीनंतरही मुख्यमंत्री कोण? या प्रश्न अनुत्तरीतच आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची माहिती दिली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा, देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांची बैठक दिल्लीत गुरुवारी रात्री झाली. रात्री नऊ वाजता सुरू झालेली बैठक मध्यरात्री १२ वाजता संपली.
एकनाथ शिंदे बैठकीनंतर काय बोलले?
बैठकीनंतर बोलताना एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, "बैठक चांगली आणि सकारात्मक झाली. ही पहिली बैठक होती. आम्ही अमित शाह आणि जेपी नड्डा यांच्यासोबत चर्चा केली."
"महायुतीची आणखी एक बैठक होईल. या बैठकीत महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार, याबद्दलचा निर्णय घेतला जाईल. ही बैठक मुंबईत होईल. महायुतीचे मंत्रिमंडळ गठीत होईल", अशी माहिती शिंदेंनी दिली.
"आमची भूमिका मी जाहीर केली. महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा, हे मी कालच (२७ नोव्हेंबर) जाहीर केले. त्यामुळे कोंडी सुटलेली आहे. त्यांची विधान मंडळ नेता निवडीसाठी बैठक होईल", असेही शिंदे म्हणाले.