कोल्हापूर: माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या घरावर आणि अन्य मालमत्तांवर CBI ने छापे टाकले आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांनंतर मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. यावरून आता राजकारण तापू लागले आहे. अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यावर दिलीप वळसे-पाटील यांना गृहमंत्रीपद देण्यात आले. अनिल देशमुख यांच्या घरावर छापे टाकल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दिलीप वळसे-पाटील यांच्यात बैठक झाली. यानंतर हसन मुश्रीफ यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देत अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेली कारवाई म्हणजे पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप करण्यात आला आहे. (hasan mushrif alleged bjp over cbi raid on anil deshmukh home)
हा पूर्वनियोजित कटाचा भाग असून लवकरच दूध का दूध और पानी का पानी होईल. अनिल देशमुख यातून निर्दोष सुटतील, अशी प्रतिक्रिया राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. अजूनही अँटिलिया प्रकरणाचा छडा का लागला नाही, अशी विचारणाही मुश्रीफ यांनी यावेळी केली.
तेव्हाच म्हणालो होतो, हा नियोजित कट आहे
ज्या दिवशी परमबीर सिंग यांचे पत्र प्रसिद्ध झालं, तेव्हाच मी म्हणालो होतो की, हा नियोजित कट आहे. देवेंद्र फडणवीस, परमबीर सिंग दिल्लीत गेले. पहाटे अमित शाहांची भेट घेतली आणि एनआयएकडे हा तपास गेला. पुराव्यांशिवाय अशी चौकशी होऊ शकते का? सीबीआयकडे तपास गेल्यानंतर कोणत्याही पुराव्याशिवाय अशी चौकशी करणे म्हणजे भाजपाने विरोधी पक्षाच्या लोकांना बदनाम करण्यासाठी केलेले कट-कारस्थान आहे, असा हल्लाबोल मुश्रीफ यांनी यावेळी बोलताना केला.
हा सगळा सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न
हा सगळा सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे. तो कधीही यशस्वी होऊ शकणार नाही, असे सांगत मुकेश अंबानींच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकं प्रकरणी एनआयएकडे तपास देऊन किती दिवस झाले. महिना होऊन गेला. तरी त्याचा तपास लागत नाही. वाझेंचं नाव मुख्य आरोपी म्हणून आलं. त्यांची पोलीस कोठडी संपून न्यायालयीन कोठडी सुरू झाली. तरी या प्रकरणाचा तपास लागत नाही, असेही मुश्रीफ म्हणाले.