Hasan Mushrif ED Raid: माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील निवसस्थानी बुधवारी पहाटे ईडीने (Enforcement Directorate) छापा टाकला. कागलसह हसन मुश्रीफ यांचे पुण्यातील निवासस्थान तसेच सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना आणि माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या निवासस्थानीही ED ने छापेमारी केली. ईडी आणि आयकर विभागाकडून ही संयुक्त कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान नक्की काय सापडलं याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. पण महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींनी मात्र ही राजकीय सूडबुद्धी असल्याचे म्हटले आहे. तसेच, याचा संबंध धार्मिक गोष्टींची आहे का, अशा आशयाची शंकाही व्यक्त केली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतेच सांगितले होते की, भारतात मुस्लिमांना घाबरून राहण्याचे कारण नाही, पण त्यानंतर २४ तासांत मुस्लीम नेते हसन मुश्रीफांवर ईडीचे छापे पडले, अशा दोन घटनांचा संबंध लावत राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी भाजपा व सरकारी यंत्रणांवर टीका केली आहे. "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतात मुस्लिमांना घाबरण्याचे कारण नाही या त्यांच्या वक्तव्यानंतर अवघ्या २४ तासातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुणे आणि कोल्हापुरात ईडी छापे टाकते याचे आश्चर्य वाटते. भाजपा सातत्याने केंद्रातील सरकारी यंत्रणांचा वापर करत आहे. महाविकास आघाडी कमकुवत करण्यासाठी आणि नेत्यांना भाजपमध्ये आकर्षित करण्यासाठी एजन्सींचा गैरवापर होत आहे. भाजपाचे काही नेते भविष्यात पडू शकणाऱ्या 'ईडी'च्या छाप्यांबाबत माध्यमातून वक्तव्य करतात आणि तसेच घडते हे विडंबनात्मक नाही का? शिंदे-फडणवीस सरकारच्या पाठीशी असलेल्या आमदार-खासदारांवरील सर्व आरोपांचे काय झाले? भाजपाने या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. ईडी, आयटीने तपास बंद करून त्यांना निर्दोष सोडले आहे का?" असे रोखठोक सवाल महेश तपासे यांनी विचारला.
दरम्यान, मुश्रीफांच्या घरी कागलमध्ये २६ अधिकाऱ्यांचे पथक पहाटे आले आणि त्यांनी कागदपत्रांची छाननी सुरू केली. या साऱ्या प्रकारानंतर लोकांची घराबाहेर गर्दी झाली असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. यापूर्वी जुलै २०१९ मध्ये हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर आणि साखर कारखान्यावर छापेमारी झाली होती. आयकर विभागाने केवळ कोल्हापुरातच नव्हे तर हसन मुश्रीफ यांच्या पुण्यातील घरीदेखील छापेमारी केली होती. हसन मुश्रीफ यांचा मुलगा साजिद मुश्रीफ यांच्या कोंढव्यातील घरावर आयकर विभागाने छापा टाकला होता. मात्र, त्यांना काहीच सापडले नसल्याचा दावा मुश्रीफ यांनी केला होता.