Jayant Patil Hasan Mushrif: हसन मुश्रीफ यांनी काही महिन्यांपूर्वी जयंत पाटलांबद्दल एक विधान केले होते. माझं कशात मन लागत नाही, असे जयंत पाटील म्हणाल्याचा दावा मुश्रीफांनी केला होता. आता जयंत पाटलांनी या विधानावर उत्तर देताना एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. 'शरद पवारांना सांगा आणि एकत्रित यायचं काहीतरी बघा', असे मुश्रीफ म्हणाल्या दावा पाटलांनी केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जयंत पाटलांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत जयंत पाटील यांना हसन मुश्रीफ यांनी केलेल्या विधानाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.
जयंत पाटलांनी ते विधान फेटाळलं, पण...
जयंत पाटील म्हणाले, "असं कधी मी म्हटलो नाही. मन रमायला काय आता विरोधी पक्षातच आहे. आणि मागेही विरोधी पक्षातच होतो. मन रमायला परिस्थिती काही बदलेली नाही. आम्ही अडीच वर्ष विरोधी पक्षात काढली. २०१४ ते २०१९ विरोधी पक्षातच होतो."
मुश्रीफांनीच मला एकत्रित येण्याबद्दल सल्ला दिला
"मन रमत नाही, असं मी मुश्रीफांना सांगण्याचा प्रश्न मला काही आठवत नाही. मी कधी त्यांना असं बोललो नाही. त्यांनीच उलट मला एकदा भेटून सांगितलं की, एकत्रित यायचं काहीतरी बघा. तुमच्याच हातात सगळं आहे. तुम्ही जरा शरद पवार साहेबांना सांगा आणि एक व्हा. असं त्यांनी मला सांगितलं. एकदा विधानसभेत भेटलेले, निवडणूक झाल्यानंतर", असा गौप्यस्फोट जयंत पाटील यांनी केला.
हसन मुश्रीफ जयंत पाटलांबद्दल काय बोलले होते?
"मला नागपूरला एकदा त्यांनी बोलून दाखवलं होतं. मुश्रीफ साहेब, माझं मन कशात लागत नाही. सत्तेत नसताना पाच वर्ष पक्ष टिकवणे आणि हे सर्व टिकून राहणे फार अवघड आहे, याची त्यांना कल्पना आली असावी. त्यांचं मन परिवर्तन होणार का हे आता त्यांनाच विचारावं लागेल", असे हसन मुश्रीफ एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले होते.