मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या पक्षात नेत्यांचे इनकमिंग सुरू झाले आहे. काल भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि शाहू समूहाचे नेते समरजित घाटगे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी आयोजित जाहीर सभेत शरद पवार यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्री आणि कागलचे विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांचे नाव न घेता लाचार असा उल्लेख करत त्यांना जागा दाखवणार असल्याचा निर्धार केला.
यावर आता हसन मुश्रीफ यांनी भाष्य केलं असून आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार आपसे बैर नहीं. लेकिन समरजीत तेरी खैर नहीं, असा नारा हसन मुश्रीफ यांनी दिला आहे. ते म्हणाले, "माझ्या सहा निवडणुकांमध्ये शरद पवार आले, ते नेहमी म्हणायचे की राजा विरोधात प्रजा जिंकली पाहिजे. तेच मी पुन्हा म्हणत आहे, की प्रजा जिंकली पाहिजे. निवडणुकीत शरद पवार आपसे बैर नहीं. लेकिन समरजीत तेरी खैर नहीं, असे हसन मुश्रीफ म्हणाले.
"शरद पवार साहेब माझे दैवत आहेत. शरद पवार साहेब माझ्या मागे का लागले आहेत, हे मला कळत नाही. ते माझ्यासारख्या अल्पसंख्यांकांच्या मागे का लागत आहेत?" असा सवाल हसन मुश्रीफ यांनी केला. तसेच, जयंत पाटील आले होते. तेव्हा समरजित घाटगे यांचा पक्षप्रवेश झाला नाही. शरद पवार साहेब आले तेव्हा प्रवेश झाला. माझ्या सारख्या अल्पसंख्याक माणसाच्या मागे का लागता? ही निवडणूक नायक विरूद्ध खलनायक अशी असेल, असे हसन मुश्रीफ म्हणाले.
याचबरोबर, लोकशाहीत एखाद्या वक्तीचे वय २५ वर्षांच्या वर झाले, की तो निवडणूक लढवू शकतो. आता तर सात पक्ष झाले आहेत, त्यामुळं उमेदवारांची मांदियाळी झाली आहे. जिथे जागा रिक्त आहेत तिकडे अनेक जण जात आहेत. गेल्या वेळी सुद्धा प्रयत्न झाला होता. पण, मेहुणे-पाहुणे समजवण्या पलिकडे आहेत. त्यासाठी निवडून यावे लागते, बहुमत लागते, असा टोलाही हसन मुश्रीफ यांनी लगावला.