सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबईवडवली हत्याकांड प्रकरणातील हसनैन वरेकर याने व्यवसायात दग्याफटक्याच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर त्याचा बहिणी व भाच्यांवर खूप जीव असल्याने आपल्या पश्चात त्यांच्यावर वाईट दिवस येऊ नयेत, यासाठी त्यांनाही जीवे मारल्याची शक्यता व्यक्त होत आहे.काही वर्षांपूर्वी हसनैनने नोकरीसाठी विदेशात जायची इच्छा वडिलांकडे व्यक्त केली होती. परंतु चार मुली व तो एकुलता मुलगा असल्याने वडिलांनी त्याला इथेच नोकरी करून कुटुंबासोबत राहण्याचे सुचवले होते. त्यानुसार काही वर्षे ठाणे येथे काम केल्यानंतर तो तुर्भेतील एका कंपनीत सुमारे ३५ ते ४० हजार पगाराची नोकरी करीत होता. दरम्यान, काही महिन्यांपासून त्याची सुपारीचा एक्सपोर्ट- इनपोर्ट व्यवसाय करण्याची इच्छा होती, असे घटनेत मृत पावलेल्या शबिना यांचे पती शौकत खान यांनी सांगितले.हसनैनने कुटुंबातल्या मोजक्याच सदस्यांना याबाबत सांगितले होते. या व्यवसायासाठी त्याने ओळखीच्या व्यक्तींकडून २० ते ३० लाख रुपये घेतले होते. परंतु काही कारणाने हसनैनच्या नावावर तो व्यवसाय सुरू होणार नसल्याने त्याच्याच ओळखीच्या ज्या व्यक्तीच्या नावे हा व्यवसाय होणार होता, त्याच्याकडे हसनैनने लाखो रुपये दिले होते, असेही समजते. त्यांच्यातील याच व्यवहारातून हसनैनला २० ते २५ लाख रुपये मिळणार होते. कदाचित हीच रक्कम मिळाली नसावी, याच्या तणावामुळे आत्महत्या केल्याची शक्यताही शौकत यांनी व्यक्त केली आहे. परंतु चारही बहिणी व भाच्यांवर त्याचे खूप प्रेम होते. विवाहित बहिणींच्या भेटीला तो कधीच रिकाम्या हाताने जात नव्हता. यामुळेच खैरणेत या भाऊ-बहिणींच्या प्रेमाची चर्चा होती. परंतु आपल्या पश्चात बहिणी व भाच्यांचे काय होईल, या चिंतेनेही त्याने स्वतच्या कुटुंबासोबत बहिणी व भाच्यांची हत्या केली असावी, अशीही शक्यता शौकत खान यांनी व्यक्त केली आहे. अनेक वर्षांपासून हसनैन हा त्याच्या नातेवाइकांना दावतसाठी घरी बोलवायचा. घटनेच्या दोन दिवस अगोदर मात्र त्याने केवळ बहिणींना बोलावले होते. त्यामुळे हसनैनची बँक खाती, घटनेपूर्वीचे फोन संभाषण यांची तपासणी करण्याची मागणी मयत मारिया यांचे दीर अश्फाक फक्की यांनी केली आहे.
हसनैनला व्यवसायात दगा?
By admin | Published: March 01, 2016 3:29 AM