ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - राज्यातल्या बेकायदेशीर धार्मिक स्थळांवर दिवाळीनंतर हटवण्याची कारवाई करण्यात येईल अशी हमी आज शुक्रवारी महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयाला दिली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात राज्य सरकारला २९ सप्टेंबर २००९ नंतर उभारण्यात आलेली बेकायदेशीर धार्मिक स्थळे पुढील ९ महिन्यांमध्ये हटवावीत असा आदेश दिला होता.
सप्टेंबर २००९मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना बेकायदेशीर धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचा व ती हटवण्याचा आदेश दिला होता. या संदर्भात राज्याचे महाधिवक्ता (अॅडव्होकेट जनरल) श्रीहरी अणे यांनी दिवाळीनंतर ही कारवाई सुरू करून नऊ महिन्यात पूर्ण करण्यात येईल असे सांगितले.
भगवानजी रियानी यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान हायकोर्टाने हे आदेश दिले आहेत.
बेकायदेशीर धार्मिक स्थळांबाबत सुस्पष्ट नीती ठरलेली असून यामध्ये नियमित करणे, स्थलांतरीत करणे व हटवणे या तीन बाबींचा समावेश आहे. राज्याने कशा प्रकारे कारवाई करावी यासाठी पालिका, जिल्हा व राज्य अशी त्रिस्तरीय समिती नेमावी अशी सूचनाही कोर्टाने केली आहे.
सात नगरपालिकांकडून आलेल्या माहितीनुसार १ फेब्रुवारी २०१५ पर्यंत ६३३६ बेकायदेशीर धार्मिक स्थळे आहेत. यापैकी २०७ नियमित करण्यात आली, १७९ हटवण्यात आली आणि तीन स्थळे स्थलांतरीत करण्यात आली.