खरंच राहुल गांधींना उत्तर प्रदेश पोलिसांनी ढकललं की ते पडले, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया
By पूनम अपराज | Published: October 2, 2020 02:13 PM2020-10-02T14:13:01+5:302020-10-02T14:14:38+5:30
Hathras Gangrape : काँग्रेसने उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकारवर टीका झाली असून अनेक ठिकाणी आंदोलनाची हाक दिली आहे.भाजपा नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी याप्रकरणी शंका उपस्थित केली आहे.
हाथरस येथील १९ वर्षीय बलात्कार पीडित तरुणीचा मंगळवारी दिल्ली येथील सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाला. या मृत मुलीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्यावरून देशातले राजकारण तापलं आहे. काँग्रेसने उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकारवर टीका झाली असून अनेक ठिकाणी आंदोलनाची हाक दिली आहे.भाजपा नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी याप्रकरणी शंका उपस्थित केली आहे. दरेकर यांनी खरंच राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशपोलिसांनी धक्काबुक्की केली की ते पडले अशी प्रतिक्रिया दिली आहे.
औरंगाबाद येथे प्रवीण दरेकर पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. राहुल गांधी यांच्यासोबत खरोखरच काही चुकीचं वर्तन झालं असेल तर प्रशासन त्याची नक्कीच गंभीर दखल घेईल. कुठल्याही नेत्याला अशाप्रकारे धक्काबुक्की होणं योग्य नाही. पण तसं काही झालं आहे असं मला वाटत नाही. राहुल गांधी यांना नेमकं ढकलून दिलं की ते पडलेत हा विषय संशोधनाचा आहे. तो तपासला जाईल,' असं दरेकर म्हणाले. 'कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अनेकदा आमच्यावरही अशा प्रकारची कारवाई करतात. सायन हॉस्पिटलच्या बाहेर आंदोलनाला बसल्यानंतर माझ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. माझ्यासह आमच्या आमदारांवर गुन्हे दाखल झाले. पोलिसांना कायदा-सुव्यवस्था महत्त्वाची वाटली, आम्हाला लोकांचा प्रश्न महत्त्वाचा वाटला. असं होत असतं. काँग्रेससारख्या मोठ्या पक्षाचे नेते असलेल्या राहुल गांधी यांना पोलीस ढकलून देतील असं मला वाटत नाही. इतके पोलीस संवेदनाहीन नाहीत. मग ते कुठलेही असोत,' असंही दरेकर पुढे म्हणाले.
काल काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी हाथरस सामूहिक बलात्कार पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी हाथरसला रवाना झाले होते. मात्र, यमुना एक्स्प्रेस वेवर प्रियंका आणि राहुल गांधींनापोलिसांनी अडवलं. यामुळे पायी प्रवास करत ते हाथरसकडे रवाना झाले. त्यानंतर आता राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांनी अटक केली आहे. पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असताना पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर राहुल गांधी आणि प्रियंका गांधींच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. याच वेळी पोलिसांनी राहुल आणि प्रियंका गांधी यांना रोखलं. तेव्हा राहुल गांधी आणि प्रियंका गांधी कार्यकर्त्यांसोबत पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी केली जात होती. याच दरम्यान उत्तर प्रदेश पोलिसांकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आली आणि यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करण्यात आली होती. यावरून राजकीय स्थरातून अनेक प्रतिक्रिया उमटायला लागल्या आहेत.