पांढुर्णा, दि. 22 - मध्यप्रदेशातील पांढुर्णा येथे पोळ्याच्या करीला जांब नदीच्या पात्रातील गोटमार यात्रेत मंगळवारी तब्बल ३७५ भाविक जखमी झालेत, तर तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. पांढुर्णा आणि सावरगावचे नागरिक प्रेम कहाणीच्या दंतकथेच्या आधारे ही पारंपरिक गोटमार करीत असते. या गोटमारीत काही वाहनाची तोडफोउ झाली असून एका रुग्णवाहिकेलासुध्दा फटका बसला. यामुळे मध्यप्रदेश पोलिसांनी लाठीचार्ज करून अश्रूधुराचे नळकांडे फोडले.
वरुडपासून मध्यप्रदेशात ३५ किमी अंतरावर असलेल्या पांढुर्णा येथे शेकडो वर्षांपासून पोळ्याच्या करीला गोटमार यात्रा भरत असते. ही यात्रा ३०० वर्षांपूर्वीच्या आख्यायिकेवर आधारित आहे. आजही शेकडो वर्षांची पंरपरा जोपासण्यात येते. गोटमार यात्रेला सुरुवात होण्यापूर्वी भाविक सूर्योदयापूर्वी जांब नदीच्या पात्रात पळसाचे भले मोठे वृक्ष लावून त्यावर झेंडा लावतात. वाजंत्रीच्या तालावर पूजा अर्चा झाली की गोटमार यात्रेला सुरुवात होते. मध्यान्नानंतर या यात्रेला चांगली रंगत चढते. विदर्भासह मध्यप्रदेशातील कानाकोपºयातून ही गोटमार यात्रा पाहण्यास भाविकांची मोठी गर्दी होेते. अखेर दोन्ही गावातील नागरिकांच्या तडजोडीने सूर्यास्तानंतर झेंडा चंडीदेवीच्या मंदिरात आणून विधीवत पूजा केली जाते. यावर्षी गोटमार यात्रेमध्ये दगडफेकीच्या धुमश्चक्रीत ३८० भाविक जखमी झाले. तर वंसत केशव काळे ३२ रा. मारुड, राजेश चैतराम ढोमणे (२८, रा. तिगाव), रामा देवराव कुमरे (२२, रा. कळमेश्वर) हे तीन गंभीर जखमी झाल्याने नागपूरला उपचाराकरिता पाठविण्यात आल्याचे आरोग्य प्र्रशासनाकडून सांगण्यात आले. प्रशासनाचे प्रयत्न निष्प्फळ !ही प्रथा बंद करण्याकरिता प्रशासनाने अनेकदा दोन्ही गावांतील नागरिकांची समजूत घातली. चार वर्षांपूर्वी दगडांऐवजी रबरी बॉलसुध्दा दिले. तरीसुध्दा प्रशासनाला न जुमानता ही गोटमार यात्रा अव्याहतपणे सुरूच आहे.