कोल्हापूर - Raju Shetty on Uddhav Thackeray ( Marathi News ) महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाने हातकणंगले मतदारसंघात उमेदवार दिला आहे. राजू शेट्टी यांच्याशी सुरू असलेली ठाकरे गटाची बोलणी फिस्कटली. शेट्टींनी उद्धव ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर लढण्यास असमर्थता दाखवली त्यामुळे आता या जागेवर ठाकरेंकडून सत्यजित पाटील यांना रिंगणात उतरवलं आहे. वैयक्तिक फायद्यासाठी मशाल चिन्हावर लढणार नाही असं सांगत राजू शेट्टींनी आता ही निवडणूक जनतेनं हाती घ्यावी असं आवाहन केले आहे.
राजू शेट्टी म्हणाले की, स्वाभिमान शेतकरी संघटना महायुतीतून बाहेर पडली होती. त्याचं कारण म्हणजे तीन तुकड्यांमधील एफआरपी, भूमिअधिग्रहण कायद्यात दुरुस्तीबाबत जो काही निर्णय झाला त्याला धोरणात्मक विरोध म्हणून आम्ही महायुतीतून बाहेर पडलो. त्यानंतर स्वतंत्र निवडणूक लढवण्याची तयारी सुरू होती. गेल्या ३ वर्षापासून आम्ही तयारी करतोय. त्या मधल्या काळात भाजपाचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीचा पाठिंबा घ्यावा अशी मागणी पुढे आली. हातकणंगलेमध्ये उमेदवार देणार नाही अशी भूमिका मविआच्या नेत्यांची घेतली होती असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत जर तिथे मविआनं उमेदवार दिला नाही तर भाजपाविरोधी मतांची विभागणी होणार नाही या भूमिकेतून मी दोनदा उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यांनीही सकारात्मक भूमिका घेतली. परंतु नंतर अचानक काय झालं माहिती नाही. २ दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंकडून निरोप आला तुम्ही मशाल चिन्हावर लढलं पाहिजे. मशाल चिन्ह शिवसेना ठाकरे गटाला मिळालंय. मी त्या चिन्हावर लढणं याचा अर्थ मी शिवसेनेत प्रवेश केल्यासारखं आहे. गेली ३० वर्ष मी शेतकरी चळवळीत काम करतोय. मी माझ्या आयुष्यात कुठल्याही राजकीय पक्षात काम केले नाही. निवडणूक लढवायला सोपे जावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली. त्यात माझ्या वैयक्तिक फायद्यासाठी शेतकऱ्यांना आणि संघटनेला वाऱ्यावर सोडून मी ही निवडणूक लढवू शकत नाही. त्यामुळे मी मशाल चिन्ह घेणार नाही असं कळवलं असा खुलासा राजू शेट्टी यांनी केला.
दरम्यान, हातकणंगलेतून त्यांनी उमेदवार जाहीर केला आहे. हा त्यांचा अधिकार आहे. खऱ्या अर्थाने गोरगरिब, शेतकऱ्यांचा, मजुरांचा आवाज संसदेत पोहचवण्याची जबाबदारी ही गावकऱ्यांनी घेतली पाहिजे. ही निवडणूक लोकांनी हातात घ्यावी. ही निवडणूक लढवू आणि जिंकूही अशी मला खात्री आहे असा विश्वास राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. त्यामुळे हातकणंगले मतदारसंघात ध्यैर्यशील माने, राजू शेट्टी आणि सत्यजित पाटील यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.