लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एप्रिल २०१६ ते एप्रिल २०१७ या १३ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ११ हजार ४१३ अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने कारवाई केली आहे. या कालावधी अंतर्गत १३ महिन्यांचे साधारणपणे ३९५ दिवस होतात. ही बाब लक्षात घेतल्यास दररोज २९ अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने निष्कासनाची कारवाई केली आहे.महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन खात्याचे उपायुक्त रणजीत ढाकणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, माटुंगा, शीव, चुनाभट्टी, वडाळा, अॅन्टॉप हिल या परिसरांचा समावेश असलेल्या ‘एफ उत्तर’ विभागात सर्वाधिक १ हजार ८४० बांधकामांवर कारवाई करण्यात आली. याखालोखाल चेंबूर, टिळकनगर आदी परिसरांचा समावेश असलेल्या ‘एम/पश्चिम’ विभागात १ हजार १९० बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. तर यानंतर ‘आर/उत्तर’ विभागात १ हजार ९५ अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. ‘आर/उत्तर’ विभागात प्रामुख्याने दहिसर परिसराचा समावेश होतो. एप्रिल २०१६ ते एप्रिल २०१७ या १३ महिन्यांच्या कालावधीत महापालिकेने अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये ३ हजार ६१९ निवासी स्वरूपाच्या, २ हजार ५०६ व्यावसायिक स्वरूपाच्या; तर ५ हजार २८८ झोपड्यांच्या/कच्च्या स्वरूपाच्या बांधकामांवरील कारवाईचा समावेश होता.>दर महिन्याला आढावा बैठकीचे आयोजनअनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याच्या दृष्टीने सुधारित कार्यपद्धती अंमलात आणण्यात आली आहे.या अंतर्गत प्रामुख्याने महापालिकेची ७ परिमंडळे व त्या अंतर्गत येणारे २४ प्रशासकीय विभाग यांच्या स्तरावर दर महिन्याला आढावा बैठकींचे आयोजन करण्यात येत आहे.संबंधित परिमंडळीय उपायुक्त व संबंधित विभागांचे सहायक आयुक्त यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित होणाऱ्या या बैठकांदरम्यान अगोदरच्या महिन्यात करण्यात आलेल्या कारवायांचा सविस्तर आढावा घेतला जातो.पुढच्या महिन्यात करावयाच्या कामांचे सुव्यवस्थित नियोजनदेखील करण्यात येते. या कार्यपद्धतीमुळे अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला गती प्राप्त झाली आहे.अनधिकृत फेरीवाले, अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांसह विविध प्रकारच्या अनधिकृत बांधकामांनाही आळा बसण्याच्या दृष्टीने संबंधित बाबींवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त अजय मेहता यांनी दिले आहेत.
दररोज २९ बांधकामांवर ‘हातोडा’
By admin | Published: June 08, 2017 2:23 AM