ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा, दि. 27 : सध्या दिवाळीच्या खरेदीसाठी प्रत्येकजण एटीएमवर पैसे काढण्यासाठी जात आहेत. पैसे काढल्यानंतर स्लीप मात्र तेथेच फेकून देण्यात येत असल्यामुळे एटीएमला कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शहरातील प्रत्येक चौकामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांचे एटीएम केंद्र आहे. शहरामध्ये ३० पेक्षा अधिक एटीएम केंद्र असून या एटीएम केंद्रांमध्ये एैन दिवाळीच्या तोंडावरच अनेक नागरिक पैसे काढण्यासाठी जात आहे. दुसरीकडे काही एटीएममध्ये पैसे नसल्यामुळे नागरिकांना खाली हात जावे लागत आहे.
जिल्ह्यातील मेहकर, लोणार, सिंदखेडराजा, चिखली, मोताळा या शहरातील बहुतांश एटीएम केंद्रावर पाहावयास मिळत आहे. शासकीय तसेच निमशासकीय कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतन, नियमित वेतन आणि बोनस दिवाळीनिमित्त दिलेला आहे.या रकमा कर्मचाऱ्यांच्या वेतन खात्यात जमा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक कर्मचारी दिवाळीच्या खरेदीसाठी लागणारे पैसे काढण्याकरिता एटीएमवर धाव घेत आहे. त्यामुळे एटीएमवर ताण पडत आहे. बुधवारी सायंकाळीचशहरातील बहुतांश एटीएममध्ये रोकड संपल्यांमुळे ग्राहकांची धांदल उडाली.
पैसे असलेल्या एटीएम केंद्रांचा शोध घेत ग्राहक फिरत होते. शहरातील काही केंद्रांवर गुरूवारी सकाळी मोठ्या रांगा पाहावयास मिळाल्या. मात्र, काही तासातच त्या एटीएमवरही पैशाचा ठणठणाट जाणवला. त्यामुळे अनेकांनी बँकेत गर्दी केली. परंतू, बँकेतही ग्राहकांची संख्या वाढल्याने काही ग्राहकांना पैसे न घेताच माघारी परतावे लागले. त्यामुळे अनेक ग्राहकांना दिवाळीखरेदी ऊसनवारीवर भागवावी लागत आहे.ग्रामीण भागातील नागरिकही परतलेशहरापाठोपाठ ग्रामीण भागातील नागरिकही एटीएमचे ग्राहक आहेत. दिवाळीची खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक शहरातील एटीएमवर पैसे काढू या उद्देशाने शहरात येतात. शहरातील एटीएमच्या भरवश्यावर आलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना येथील बंद एटीएममुळे माघारी परतावे लागत आहे. त्यामुळे अनेक नागरिक बंद एटीएममुळे दिवाळीची खरेदी न करताच गावाकडे परत गेले.