उमरा ( जि.अकोला ), दि. 8 - सहा हजार लोकसंख्येच्या गावात सहा अवैध दारूची दुकाने. व्यसनाने गावातील तब्बल 26 जणांचा गेला बळी. आपल्या गावातील तरुण पोरांना दारूच्या चक्रातून बाहेर काढण्याचा 42 तरुणांनी संकल्प केला. दारू विक्रेत्यांपासून तर प्रस्थापितांपर्यंत ध्येय प्राप्तीसाठी निवडली संघषार्ची वाट. या वाटेवर आलेल्या धमक्यांना भीक न घालता २१/७ ला व्यसनाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या गावातून दारू हद्दपार केली. ही कहाणी आहे, उमरा गावातील तरुणांची.
गावातील कोवळ्या वयातील मुलांना दारूची चटक लागली होती. व्यसनामुळे अनेकांचा जीव गेला आहे. अनेकांचे जीवन संपविणा-या दारूबाबत प्रत्येकाच्या मनात घृणा निर्माण झाली आहे. गावात दारूबंदी करण्यासाठी एक एक करीत 42 तरुण एकत्र आले. सुरुवातीला त्यांच्या विरोधाकडे कुणीही लक्ष दिले नाही. तरीही ते तरुण आपल्या निर्णयावर ठाम राहिले.
त्या तरुणांनी ग्रामसभेत ठराव मांडला आणि तो मंजूर केला. अनेक वर्षांपासून दारूच्या दुष्टचक्रात अडकलेल्या उमरा गावात दारूबंदी झाली. त्या तरुणांनी खासदारांना निवेदन देऊन यावेळी खासदार धोत्रे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि याप्रकरणी त्वरित कारवाई करा, असे सांगितले.
गावामध्ये घडवली क्रांती गावात २४ तास दारू विक्री होत असे. रात्री ३ वाजताही दारू मिळत असे, त्यामुळे महिला त्रस्त झाल्या होत्या. दिवसा शाळेत जाणा-या मुलींचीही छेडछाड काढली जात होती. त्यामुळे अन्यायाविरुद्ध आवाज उठवून गावात क्रांती घडवून आणली. - स्वप्निल इंगळे, युवक.
विक्रेत्यांची निघेल गाढवावर धिंड!दारू विक्रेत्याची समजूत घालून दारू विक्री बंद करण्यात आली. तरीही दारू विक्रेत्यांनी दारू विकली, तर त्यांची गावातून गाढवावर मिरवणूक काढण्यात येईल, असा इशारा ग्रामसभेत त्या ४२ तरुणांनी दिला.