हत्तूर गटात ‘हेवीवेट’ उमेदवारांत चौरंगी सामना सोलापूर : आॅनलाईन लोकमत दक्षिण सोलापूर तालुक्यात एकमेव खुल्या हत्तूर जिल्हा परिषद गटात ‘हेवीवेट’ उमेदवारांचा रंगतदार चौरंगी सामना होत आहे. वाळू तस्करी आणि सीना नदीचा पाणीप्रश्न प्रचाराचा केंद्रबिंदू ठरत आहे. नेतेमंडळींनी आपल्या उमेदवारांसाठी राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली आहे. हत्तूर जि. प. गटाकडे तालुक्याचे लक्ष वेधले आहे. माजी आमदार रतिकांत पाटील यांचे सुपुत्र सेनेचे उमेदवार अमर पाटील आणि भाचे काँग्रेस उमेदवार आप्पासाहेब पाटील या गटात आमने-सामने आहेत. भाजपाने डॉ. चनगोंडा हविनाळे यांना मैदानात उतरविले आहे. हविनाळे हे काँग्रेसकडून लढण्यास उत्सुक होते; मात्र आप्पासाहेब पाटील यांची उमेदवारी काँग्रेसने पक्की केल्याचे कळताच हविनाळे भाजपात दाखल झाले आणि उमेदवारी मिळविली. राष्ट्रवादीकडून सेवानिवृत्त शिक्षक सुभाषचंद्र बिराजदार रिंगणात आहेत. अमर पाटील, आप्पासाहेब पाटील आणि डॉ. हविनाळे या तीन तगड्या उमेदवारांत चुरशीची लढत होत आहे. विकास आघाडीच्या काळात डॉ. हविनाळे यांनी सभापतीपद भूषविले आहे. अमर पाटील राष्ट्रवादीतून पं. स. सदस्य आहेत. आप्पासाहेब पाटील यांनी डीसीसी बँकेची निवडणूक लढविल्याने ते चर्चेत आले आहेत. माजी सभापती चंद्रकांत सुर्वे (अपक्ष), फिरोज पटेल (अपक्ष), राधाकृष्ण पाटील (रासप) हेही रिंगणात आहेत. डॉ. हविनाळे वगळता अन्य प्रमुख राजकीय पक्षाचे तिन्ही उमेदवार मतदारसंघाबाहेरचे आहेत. ‘स्थानिक’ आणि ‘उपरा’ हा वाद या गटातही आहे. भाजपाने आप्पासाहेब पाटील यांच्या वाळू व्यवसायाला प्रचारात लक्ष्य बनविले आहे. मात्र काँग्रेसचे नेते पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावत आहेत. माजी आमदार रवी पाटील आणि रतिकांत पाटील यांच्या कुटुंबातील ही लढाई असून पाटील घराणे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. याचा लाभ उठविण्यासाठी भाजपाने व्यूहरचना आखली आहे. नाराज असलेले शिवानंद वरशेट्टी, आप्पासाहेब मोटे, बसवेश्वर करजगी यांना प्रचारात सक्रिय करून हत्तूरचा गड ताब्यात घेण्याचा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा प्रयत्न आहे. औराद गणात माजी मंत्री आनंदराव देवकते यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांचे पुत्र अशोक देवकते काँग्रेसचे उमेदवार आहेत. धनगर समाजाचा प्रभाव असलेल्या या गणात पंडित बुळगुंडे (भाजपा), संदीप टेळे (शिवसेना), बापूराव पाटील (रासप), अशोक देवकते (काँग्रेस) यांच्यात खरी चुरस आहे. देवकते कुटुंबात सत्ता कायम राहिल्याने समाजात नाराजीचा सूर आळवला जात आहे. ही नाराजी पक्षाला अडचणीत टाकू शकते. हत्तूर गणात शारदाबाई दिंडोरे (काँग्रेस), लक्ष्मीबाई पाटील (भाजपा), मनीषा मिराखोर (राष्ट्रवादी), सुवर्णा दिंडोरे (अपक्ष) या आहेरवाडीच्या उमेदवारात चुरस आहे. -----------------------------सीनेचे पाणी ठरतेय कळीचा मुद्दागेल्या काही वर्षांत सीना नदीकाठ कोरडा ठणठणीत पडतोय. नदीकाठची बागायती शेती करपून जात आहे. सीनेला भीमेप्रमाणे पाणी सोडण्यासाठी कालव्याचा दर्जा देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. काँग्रेसने त्याकडे दुर्लक्ष केले. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे या प्रश्नासाठी शेतकऱ्यांचा पाठपुरावा सुरू आहे. प्रचार शुभारंभात देशमुख यांनी सीनेला पाणी सोडल्याचे सांगताना, कालव्याच्या दर्जाबाबत भाष्य टाळले. अन्य पक्षांच्या याबाबत काय भूमिका आहेत. यावरच सीनाकाठच्या शेतकऱ्यांची भूमिका ठरणार आहे.
हत्तूर गटात ‘हेवीवेट’ उमेदवारांत चौरंगी सामना
By admin | Published: February 16, 2017 6:53 PM