युतीत ‘सन्मान’कलह : भाजपाचा अल्टिमेटम शिवसेनेने धुडकावला
मुंबई : भाजपाने संघर्षाचा पवित्र घेत, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाच्या फॉम्र्युल्यावर सहमत व्हा किंवा युती तोडण्यास तयार राहा, असा निर्वाणीचा इशारा शिवसेनेला दिला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या सन्मानाशी आम्ही तडजोड करणार नाही, अशा शब्दांत शिवसेनेकडून प्रत्युत्तर आल्याने दोन्ही पक्षांची युती तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी सकाळी कोल्हापूर येथे भाजपा नेत्यांसोबत एका हॉटेलमध्ये चर्चा केल्यानंतर भाजपाने हा अल्टिमेटम दिला आहे. आत्मसन्मानाची किंमत चुकवून कोणताही समझोता केला जाणार नाही, असे शहा आणि भाजपा नेत्यांच्या चर्चेत ठरले होते. 25 वर्षापासून मित्रपक्ष असलेली शिवसेना जास्त जागांवर निवडणूक लढण्याच्या भाजपाच्या प्रस्तावावर कोणतीही प्रतिक्रिया देत नसल्याबद्दल भाजपा नेते नाराज आहेत, असे सूत्रंनी सांगितले. भाजपाने या वेळी आपली मागणी वाढवीत 135 जागांवर लढण्याचा प्रस्ताव दिला आहे. परंतु शिवसेनेने हा प्रस्ताव फेटाळून लावत एवढय़ा जागा देणार येणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
भाजपाने स्वबळावरच लढावे..
च्भाजपाचे अध्यक्ष अमित शहा आज कोल्हापुरात होते. दुपारी पावणोबारा वाजण्याच्या सुमारास ते येथील हॉटेलमध्ये थांबले होते. त्यांच्या शेजारीच प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस व विरोधी पक्षनेते विनोद तावडे बसले होते. त्याचवेळी तावडे यांच्या मोबाइलवर एक मेसेज आला. तावडे यांनी तो शहा यांना वाचून दाखविला.
च्लोकसभा निवडणुकीप्रमाणोच विधानसभेलाही महाराष्ट्रातील जनतेला एकपक्षीय राजवट हवी आहे असे सव्र्हेक्षणाचे निष्कर्ष आहेत. त्यामुळे भाजपाने स्वबळावर लढणोच जास्त चांगले आहे, असा तो मेसेज होता. तावडे यांनी तो वाचून दाखविल्यावर शहादेखील काही क्षण गंभीर झाले.
राम कदम, विजय कांबळे, वसंत वाणी भाजपात
मनसेचे आमदार राम कदम व राष्ट्रवादीचे नेते विजय कांबळे आणि वसंत वाणी यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत पुणो येथे भाजपात प्रवेश घेतला.
2009च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने 119 आणि शिवसेनेने 169 जागांवर निवडणूक लढविली होती. या वेळी युतीत चार पक्ष सामील झालेले आहेत. सेनादेखील इरेस पेटली आहे.
आज मातोश्रीवर शिवसेना नेत्यांच्या बैठकीत भाजपाकडून आलेल्या कथित अल्टिमेटमवर चर्चा झाली. भाजपाने यापूर्वी 135 जागांची मागणी केली होती. आता 125 जागा देण्याचा आग्रह भाजपाने धरला आहे ही बाब शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेत्यांच्या बैठकीत निदर्शनास आणली. महाराष्ट्राचा आणि दिवंगत शिवसेनाप्रमुखांचा सन्मान राखला जाईल, असा समझोता करण्याचे सर्वाधिकार शिवसेना नेत्यांनी उद्धव यांना दिले.
सेनेने दोन पावले मागे जावे
भाजपा दोन पावले मागे जायला तयार आहे, सहयोगी शिवसेनेनेही दोन पावले मागे जाऊन सन्मानपूर्वक युती करावी, असे आवाहनही शहा यांनी राज्यातील नेत्यांना केले.
हा महाराष्ट्राच्या आत्मसन्मानाचा प्रश्न आहे. सन्मानजनक जागावाटप व्हावे. नाहीतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील त्यासोबत संपूर्ण महाराष्ट्र असेल. - खा. संजय राऊत, शिवसेना
आम्ही वेळेचं बंधन मानत नाही, मानणार नाही. अल्टिमेटमला सेना जुमानत नाही. - रामदास कदम, सेनानेते
आज फैसला
शिवसेनेने जागा वाढवून देण्यास नकार दिल्याने भाजपाने शुक्रवारी स. 11 वा. कोअर कमिटीची बैठक बोलाविली असून त्यामध्ये अंतिम फैसला केला जाणार आहे.