रस्त्यावर बेधडक वाहने चालविणाऱ्यांवर पोलीसांकडून जोरदार कारवाई सुरू आहे. या मोहिमेबद्दल विश्वास नांगरे-पाटील आणि रस्त्यावर दिवसभर थांबून काम करणाऱ्या पोलिसांचे अभिनंदन करायला हवे. आपण नेहमीच पोलिसांवर शंका घेतो, टीका करतो. मात्र, या मोहिमेत सापडलेल्यांचे वर्तन कोणते आहे ? कायदा काय सांगतो आणि आपण बेदरकारपणे वागतो कसे? याचे उत्तर कोण देणार ?ध्येयाचा शोध घेताना अनेक ब्रेक लागायचे, ठेचा लागायच्या. अनेकदा दोरी तुटलेल्या पतंगासारखी स्थिती व्हायची. माझ्या डोळ्यात भोळीभाबडी स्वप्नं होती. त्यांना प्रयत्नांची, कष्टाची जोड दिली. जेवढा मोठा संघर्ष, तेवढं मोठं यश !काळ बदलतो, वेळ बदलते, पात्रं बदलतात आणि भूमिकाही ! बस्स ! मनगटात स्वप्नांना जिवंत करण्याची, पंखांत बळ निर्माण करण्याची, लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची जिद्द आणि अविरत संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागते. माझ्यासारख्या तळागाळातल्या, कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या घरातल्या अपुऱ्या साधन-सामग्रीनं आणि पराकोटीच्या ध्येयनिष्ठेनं कुठल्यातरी कोपऱ्यात ज्ञानसाधना करणाऱ्या अनेक ‘एकलव्यां’ना दिशा दाखविण्यासाठी हा पुस्तक प्रपंच केला आहे.कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी आपल्या आत्मचरित्र्याच्या मलपृष्ठावर त्याचं प्रयोजन सांगितले आहे. म्हटले तर ते त्यांच्या जीवनयात्रेची दिशा आहे आणि म्हटले तर आजच्या समाज वाटचालीतील ‘एकलव्यां’ची कहाणी आहे. त्यांनी आत्मचरित्रात्मक पुस्तकातून व्यक्त होण्याचा जो प्रयत्न केला आहे, तो एक प्रातिनिधीक असला तरी आपल्या समाजाच्या (तुमच्या-आमच्या परिसराच्या) वाटचालीचा तो भाग आहे. त्यांचा निर्धार आहे. त्यासाठीचे कष्ट आहेत, संपूर्ण व्यवस्थेतील ‘मी एक अधिकारी, एक प्रशासनातील दुवा आहे’, असेही त्यास म्हणता येईल. वडील गावचे सरपंच असलेल्या गावातून ते आलेले असले तरी शाळेची पायरी चढताना वाहणा काढाव्या लागत नव्हत्या. कारण ते अनवाणीच शाळेची वाट तुडवित होते. अशा एका विश्वातून आलेल्या विश्वास नांगरे-पाटील यांनी आपल्या मनात एक विश्वास आहे, ‘मन में है, विश्वास!’ असे म्हटले आहे.ही सर्व आठवण जागी करण्याची कारणे दोन आहेत. एक तर कोल्हापूरच्या इतिहासात त्यांच्या पुढाकाराने एका देशातील उंचीच्या पातळीवरील दुसऱ्या क्रमांकाचा ध्वज उद्या महाराष्ट्रदिनी आजन्म फडफडत राहणार आहे. त्याची उंची तीनशे तीन फूट असणार आहे. ती एक ऐतिहासिक नोंद होणार आहे. ज्या कोल्हापूरच्या मातीत त्यांची जडणघडण झाली, त्याच मातीवर असा झेंडा फडकाविण्याची संकल्पना राबविण्याचे आणि आपण सारे त्याचे साक्षीदार असल्याचे भाग्य लाभणेही महत्त्वाचे आहे. दुसरे कारण ते फार महत्त्वाचे आणि लोकशिक्षणाचे आहे. आपण साऱ्यांनी आत्मक्लेश करून घेण्यासारखे आहे. कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील प्रशस्त रस्त्यावरून प्रदीप सोळंकी हे उद्योजक दुपारच्या जेवणासाठी घरी निघाले होते. त्यांच्या दुचाकीस सहज धक्का मारून जावं, असा एक धक्का दुसऱ्या दुचाकीधारकाने दिला. तो मागे वळूनही पाहिला नाही. ज्याला आपण (अनवधानाने का असेना) धक्का दिला तो माणूस रस्त्यावर कोसळतो आहे, तरी त्याची फिकीर नाही. कोसळलेले सोळंकी सद्गृहस्थ आपल्या साठाव्या वाढदिवशीच मरण पावले. हे उदाहरण याच्यासाठी की, विश्वास नांगरे-पाटील यांच्या पुढाकाराने रस्त्यावर बेधडक वाहने चालविणाऱ्यांवर जोरदार कारवाई सुरू आहे. ही घटना घडण्यापूर्वीच त्यांनी ही कारवाई कोल्हापूर पोलीस परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांत सुरू केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात एकाच दिवशी किमान सहा ते सातशे पोलीस कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. येणाऱ्या-जाणाऱ्या आपल्या भावी पिढीकडे (देश घडवू पाहणारी) दुचाकी चालविण्याचा परवाना मागत आहेत. दुचाकीची कागदपत्रे मागत आहेत. त्या दुचाकीचा विमा उतरविला आहे का? असे साधे प्रश्न करीत आहेत. दुचाकी वाहनावर दोघांनाच प्रवास करण्याची मुभा असताना तिघे बसले म्हणून रोखत आहेत. ही तशी साधी वाहन चालविणाऱ्यांची सभ्यता तपासण्यासारखीच बाब आहे. त्यासाठी मोहिमेच्या एका दिवशी जिल्ह्यात किमान दोन हजार लोकांना पकडताच निम्म्याहून अधिकजण विना वाहकचालक परवाना न घेता वाहन चालविताना आढळून आले. जवळपास दहा टक्के वाहनचालक ट्रिपलसीट होते. या मोहिमेबद्दल विश्वास नांगरे-पाटील आणि चाळीसच्यावर तापमान असताना रस्त्यावर दिवसभर थांबून काम करणाऱ्या पोलिसांचे अभिनंदन करायला हवे.हा सर्व प्रपंच या सदरात करण्याचे प्रयोजन यासाठीच की, हा आपल्या समाजाचा फाटलेला चेहरा आहे. आपण (तुम्ही-आम्ही) कसे वागतो आहोत? पालक कसे वागताहेत? प्रशासन कसे वागत आहे? राज्यकर्ते किंवा लोकप्रतिनिधी कसे वागताहेत? हे सर्व प्रश्न उपस्थित होत आहेत. आपला पाल्य कायद्याने वाहन चालविण्यास सज्ञान नाही, याची कल्पना असतानाही कोल्हापूर, सांगली, मिरज, इचलकरंजी, कऱ्हाड किंवा सातारा आदी गजबजलेल्या शहरातही वाहन चालविण्यासाठी दिले जाते. त्याला परवाना मिळत नाही. कारण त्यांचे वयच बसत नाही. तरीसुद्धा कायदा मोडणारे शेकड्याने पोलिसांना सापडत आहेत. आपण नेहमीच पोलिसांवर शंका घेतो, टीका करतो, गैरव्यवहार करतात म्हणतो, भ्रष्टाचारी आहेत, असे म्हणतो. असे असेल तर या मोहिमेत सापडलेल्यांचे वर्तन कोणते आहे? कायदा काय सांगतो आणि आपण बेदरकारपणे वागतो कसे? याचे उत्तर कोण देणार? एकाच दिवशी एका जिल्ह्यात अडवेल त्याच्याकडे काही तरी गुन्हा सापडावा ही गंभीर बाब आहे. विशेषत: तरुणांना किंवा विद्यार्थ्यांनाच याची जाणीव करून देण्यासाठी या मोहिमेत त्यांच्यावर विशेष लक्ष दिले होते. ज्या पोलिसांनी दुष्कर्म करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी, समाजातील गैर वागणाऱ्यांना रोखावे, चोरांना पकडावे, दरोडेखोरांना गोळ्या घालाव्यात असे आपण म्हणतो. हिंसाचाराच्या विरोधात त्यांनी काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत असताना आपण मात्र इतके बेदरकार झालो आहोत की, तुमच्यावर ही कारवाई करून घेण्याची वेळ यावी? हे समाजाचे अध:पतन आहे.कॉलेजला जाणारा तरुण दुचाकी, मोबाईल, कपडे, सोने-नाणे आणि उंची कपडे अशा किमान लाख रुपयांच्या वस्तूंसह वावरतो आहे. या सर्व गोष्टी कोठून आल्या? महाविद्यालयाची यात जबाबदारी काय? शिक्षकांची भूमिका काय? लोकप्रतिनिधींची भूमिका काय? समाजसेवकांची भूमिका काय? शेकड्यांनी गल्ल्या-गल्ल्यात असलेल्या मंडळांची भूमिका काय? आपला समाज एखादा पडदा उघडावा आणि त्याच्यामागे लपलेला विद्रुप चेहरा आपणास पाहण्याची वेळ यावी, असेच याचे वर्णन करावे लागेल.महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने या सर्वांचा खूप गांभीर्याने आणि विस्ताराने विचार करण्याची गरज आहे. विश्वास नांगरे-पाटील यांनी टाकलेले हे एक पाऊल आहे. कारण ते अनवाणी शिक्षणासाठी जात होते. आता कोणीही स्वत:च्या पायांनीसुद्धा शिक्षणासाठी शाळा-महाविद्यालयांपर्यंत जात नाही. इतका महाराष्ट्र बदलला आहे. महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक वाहनांची निर्मिती होते. (देशाच्या ३३ टक्के). महाराष्ट्रात वाहनविक्रीतील वाढीचा दरही देशातील इतर राज्यांच्या तुलनेने अधिक आहे. तो किमान आठ ते नऊ टक्क्यांनी वाढेल असे वाटत होते. ही वाढ तेहतीस टक्के आहे. म्हणजे वर्षाला इतकी वाहने रस्त्यावर येत राहतील, तर दर चार वर्षांनी वाहनांची संख्या दुप्पट होत राहणार आहे. कामावर जाणारा वर्गच वाहन वापरायचा. शाळा-कॉलेजची मुले चालत किंवा सार्वजनिक वाहनांनी जा-ये करायची. निपाणीला देवचंद कॉलेजला असताना कागल तालुक्यातील सेनापती कापशी खोऱ्यातील अनेक गावची मुलं-मुली पोटात अन्नाचा कण नसताना दोन-दोन तास एकमेव मुक्कामाच्या एस. टी. गाडीसाठी रस्त्यावर थांबून राहायची.ते म्हणतात, तसा काळ बदलतो वेळही बदलली आहे. आपणही बदलत आहोत; पण कोणत्या दिशेने? एकलव्यासारखी शिक्षण घेऊन नव्हे, तर पैसा मोजून शिक्षण विकत घेऊन तयार होत आहोत. सर्व काही पैशाने विकत घेता येते? तर मग विनापरवाना वाहन चालविले तर कुठं बिघडलं? ही घमेंड तुमच्या-आमच्यात आली आहे. त्याचा सर्वांत मोठा धोका समाजाला आहे. त्यामुळेच ही मोहीम छोटी असली तरी आजच्या समाजाचे वास्तव्य उघडं-नागडं करून दाखविणारी आहे. पोलिसांच्या एका छोट्या मोहिमेचे इतके कौतुक किंवा त्याचा गवगवा करावा का? असेही विचारणारे महाभाग भेटतील. मला तरी वाटते, ही मोहीम सुरुवात आहे. प्रशासनाने सर्वच बाबतीत ही मोहीम राबवावी. त्याचवेळी पर्यायी व्यवस्था करण्याचीही जबाबदारी घ्यावी. आजच्या वाहन वाढीचा दर पाहिला तर शहरामध्ये वाहने चालविणे मुश्कील होणार आहे. ती कोठे लावायची ही समस्या होणार आहे. मुंबई किंवा पुण्यासारख्या शहरात वाहन असूनही रस्त्यावरून घेऊन जायला नको, असे वाटते. कारण इच्छितस्थळी पोहोचल्यावर ते लावायचे कोठे? ही मोठी समस्या आहे. ती आता कोल्हापूर, सांगली किंवा इचलकरंजीसारख्या शहरातसुद्धा भेडसावणार आहे. एका बाजूला ही अवस्था असताना आपण सारेच भ्रष्ट विचार करतो आहोत. या नव्या समाजातील नव्या प्रश्नांचा आपण शोध घेण्याचेच बंद केले आहे. एखादे नांगरे-पाटील असतील, बाकीचे काय करताहेत?वापरलेला कागद, भाजीपाला कोठेही टाकून देतो आहोत. महाराष्ट्रात दररोज सोळा हजार टन घनकचरा तयार होतो आहे. त्यापैकी सोळाशे टनाचीही विल्हेवाट लावता येत नाही. याचीही सुरुवात घराघरांतून करावी लागणार आहे. ओला आणि सुका कचरा एका-एका घरातून वेगळा करून बाहेर द्यावा लागणार आहे. तेव्हा कोठे त्याची विल्हेवाट लावण्याची सुरुवात होईल. त्याची चिंता कोणालाही नाही. केवळ दक्षिण महाराष्ट्रातील नगरपालिका-महापालिका असणाऱ्या शहरात वर्षाला दोन लाख टन घनकचरा गोळा होतो. त्यापैकी दोन हजार टनावरही प्रक्रिया होत नाही.वाढत्या गुन्हेगारीबरोबरच हे सर्व सार्वत्रिक प्रश्न गंभीर होत आहेत. त्या सर्वांचे आपण निर्माते आहोत ना? सांडपाण्याचे काय करायचे, नद्यांची बरबादी करायची, कचऱ्यांचे तेच करायचे, रस्त्यावर वाहने चालविताना बेदरकारपणा करून एखाद्याला मारून टाकायचे, अशा किती चुका आपण दररोज करीत आहोत. तेव्हा तीनशे फुटावरील दिमाखदार झेंड्याप्रमाणे अभिमानाने, आनंदाने, समृद्धीच्या मार्गाने जायचे असेल, तर सर्वांनी आपल्या मनात नव्या समाजनिर्मितीचा विश्वास जागवायला हवा, तरच हे शक्य आहे, अन्यथा दरवर्षीचा महाराष्ट्र दिन साजरा होईल. महाराष्ट्र घडविण्याचे पाऊल काही पुढे पडणार नाही. त्यासाठी मनमनात विश्वास निर्माण करावा लागेल, तरच खऱ्या अर्थाने आधुनिक महाराष्ट्र उभा राहील.- वसंत भोसले
मन में है, विश्वास !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2017 1:19 AM