कधी निवडून आलाय का?; आमदारांना 'खोक्याभाई' म्हणणाऱ्या राज ठाकरेंना अजित पवारांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 13:20 IST2025-03-24T13:19:59+5:302025-03-24T13:20:23+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोचरा सवाल विचारत राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

कधी निवडून आलाय का?; आमदारांना 'खोक्याभाई' म्हणणाऱ्या राज ठाकरेंना अजित पवारांचा टोला
NCP Ajit Pawar: बीड जिल्ह्यातील सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या गुन्हेगारी कृत्यांची मागील आठवडाभर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. याचाच आधार घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतंच एक वक्तव्य करत विधानसभेत निवडून आलेल्या आमदारांना टोला लगावला. "तुम्ही एका खोक्याभाईचे काय घेऊन बसला आहात सर्व विधानसभा खोक्याभाईंची आहे," अशा शब्दांत राज यांनी महायुतीला टोला लगावला होता. राज ठाकरेंच्या या टीकेला आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोचरा सवाल विचारत प्रत्युत्तर दिलं आहे.
राज ठाकरेंनी आमदारांबाबत खोक्याभाई शब्द वापरून केलेल्या टीकेबद्दल तुमची प्रतिक्रिया काय, असा प्रश्न पत्रकारांकडून अजित पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर "तुम्ही कधी निवडून आलाय का?" असं म्हणत अजित पवार यांनी मनसेच्या निवडणुकांतील अपयशावर बोट ठेवलं आहे.
दरम्यान, अजित पवार यांनी राजकीय अपयशाचा मुद्दा उपस्थित करत डिवचल्यानंतर आता राज ठाकरेंकडून कसा पलटवार केला जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
तुम्ही कधी निवडून आलात का, राज ठाकरेंना अजितदादांनी डिवचलं..#LokmatNews#MaharashtraNews#AjitPawar#RajThackeraypic.twitter.com/9bif0B08O6
— Lokmat (@lokmat) March 24, 2025
राज ठाकरे सत्ताधाऱ्यांचा घेणार समाचार
राज ठाकरे हे गुढीपाडवा मेळाव्यातून सत्ताधारी महायुतीचा समाचार घेणार असून याबाबतचे संकेत त्यांनी काल मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना दिले आहेत. "सध्या मूळ विषय बाजूला राहिले आहेत आणि लोकांना बाकीच्याच विषयांमध्ये भरकटून टाकले जात आहे. मनात अनेक गोष्टी साचल्या आहेत. त्या गुढीपाडवा मेळाव्यात मी बोलणार आहे," असं राज ठाकरेंनी सांगितलं आहे.