तुम्ही लिहायला, वाचायला शिकलात ना, ते काँग्रेस पक्षाचं देणं; सुळेंचा भाजपाला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 08:39 AM2023-12-31T08:39:21+5:302023-12-31T08:40:31+5:30
सर्वसामान्य मायबाप जनतेला या सरकारमध्ये काहीही मिळालेलं नाही त्यामुळे या सरकारच्या विरोधात आपल्याला मोठी लढाई लढाईची आहे असं त्यांनी सांगितले.
पुणे - Supriya Sule on BJP ( Marathi News ) एका बाजूला काँग्रेस आणि एका बाजूला भारतीय जनता पक्ष. पुण्यामध्ये वीज कोणी आणली ? शाळा कोणी आणल्यात ? हॉस्पिटल कोणी आणलं ? कारखाने कोणी काढलेत ? आयटी कोणी आणली ? पुण्यामध्ये सर्व मोठे ब्रिज कोणी बांधले ? रस्ते मोठे कोणी केले ? फोन कोणी आणलेत ? व्हाट्सअप कोणी आणलं ? इंस्टाग्राम कोणी आणलं ? बँका कोणी काढल्यात ? हे सर्व काँग्रेस पक्षाने केलं. संसदेत आम्हाला जे सुनावतात ना त्यांना मी सांगते की, तुम्ही जे लिहायला, वाचायला शिकलात ना ते काँग्रेस पक्षाचे देणे आहे म्हणून तुम्ही शिकलेला आहात अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपावर निशाणा साधला.
पुण्यात झालेल्या शेतकरी आक्रोश मोर्चाच्या सांगता सभेत त्या बोलत होत्या. सुळे म्हणाल्या की, सरकार जर सर्वच गोष्टी प्रायव्हेट कंपन्यांना देणार असेल, तर आम्ही टॅक्स कशासाठी भरायचा ? हे सर्व जे बोलतात ना, आम्ही विकास करतो, विकास करतो ते कोणाच्या पैशांनी करतात तुमच्या घरातून ते पैसे येत नाही. आम्ही टॅक्स भरतो. आम्ही जीएसटी भरतो त्यामुळे हा विकास होतो या सरकारला पॉलिसी पॅरालिसीस झालेला आहे. सर्वसामान्य मायबाप जनतेला या सरकारमध्ये काहीही मिळालेलं नाही त्यामुळे या सरकारच्या विरोधात आपल्याला मोठी लढाई लढाईची आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच मी राजकारणात कशासाठी आली तर तुमच्या जीवनात एक वेगळा बदल घडवण्यासाठी आली आहे आणि तीन गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही सर्वांनी काम केले पाहिजे. सेवा, सन्मान आणि स्वाभिमान; सेवा मायबाप जनतेची, सन्मान शेतकऱ्यांचा, महिलांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा आणि स्वाभिमान तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्राचा, त्यामुळे ही संघर्षाची लढाई मला भीतीदायक वाटत नाही. मी शिवछत्रपतींचे नाव घेते आणि ज्यांचे संस्कार आमच्यावर झाले ते कैलासवासी यशवंतराव चव्हाण. ते फक्त फोटो पुरतं नाही तर, आमच्या कामातूनच दिसते असा टोला सुप्रिया सुळेंनीअजित पवार गटाला लगावला.
दरम्यान, शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांचे मी आभार मानते. गेले ३ दिवस-रात्र आपण या आक्रोश मोर्चात सहभागी झालात. लोकांपर्यंत पोहोचलात. एक वेगळा आक्रोश आणि हा निरोप मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचलाय. त्यामुळे याचे सर्वात मोठे यश आणि पोचपावती म्हणजे या राज्याचे मुख्यमंत्री हे पहिल्यांदा शिरूर लोकसभा मतदारसंघात येत आहेत त्यातच आपल्याला यश मिळालेले आहे असंही सुळेंनी म्हटलं.