लोकमत न्यूज नेटवर्कलोणी काळभोर : हवेली तालुक्याच्या पूर्व भागात चांगला प्रतिसाद मिळाला. लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचन या गावातील सर्व दुकाने बंद होती. उरुळी कांचनमध्ये शेतकऱ्यांनी प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून सरकारचा निषेध केला. कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या हद्दीत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मांजरी उपबाजारात अत्यंत कमी शेतमाल विक्रीसाठी आला होता. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मांजरी उपबाजारात आज अत्यंत कमी प्रमाणात भाजीपाला विक्रीसाठी आणला होता. या बाजारात पुणे शहर व उपनगरातील व्यापारी भाजीपाला खरेदीसाठी गर्दी करतात. हे व्यापारी दररोज साधारण पाचशे छोटे-मोठे टेंपो घेऊन माल खरेदी करून शहर व उपनगरात विक्रीसाठी घेऊन जातात. आज हे व्यापारीही कमी आले होते. पर्यायाने व्यापाऱ्यांचे टेंपोही अत्यंत कमी आले होते. आलेल्या सर्व व्यापाऱ्यांना भाजीपाला मिळाला नाही. कालच्या तुलनेत आज भाजीपाल्याचे भाव आज खूपच वाढले होते. काल टोमॅटो, वांगी, मेथी या सर्व भाजीपाल्याचे भाव आज खूपच वाढले होते. त्यामुळे काही व्यापाऱ्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागले. लोणी काळभोर गावातील सर्व दुकाने बंद असल्याने येथील सर्व व्यावसायिकांनी या बंदला उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला. हवेली पंचायत समितीचे सदस्य युगंधर ऊर्फ सनी काळभोर, कमलेश काळभोर व त्यांच्या सहकाऱ्यांनी याकामी पुढाकार घेतला होता. त्यांच्या आवाहनाला सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला. कुंजीरवाडी गावातील सर्व व्यवहार आज बंद होते. येथील व्यावसायिकांनीही आपापली दुकाने बंद ठेवून संपकरी शेतकऱ्यांना पाठिंबा व्यक्त केला. उद्या मंगळवारी कुंजीरवाडी गावातील आठवडेबाजार बंद ठेवण्यात येणार आहे.-------------लोकमत न्यूज नेटवर्कउरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील शेतकरी कृती समितीच्या वतीने सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. गावातील संपूर्ण व्यवहार बंद ठेवून दुकानदार व व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभाग नोंदविला.उरुळी कांचनच्या शेतकरी कृती समितीने सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करीत सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अंत्ययात्रा ग्रामपंचायत कार्यालयापासून सुरू करण्यात आली होती. पुढे आश्रम रोडवरून एलाईट चौकापर्यंत व एलाईट चौक ते तळवाडी चौकापर्यंत ही अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेच्या वेळी घेण्यात आलेल्या शोकसभेमध्ये उपस्थित शेतकऱ्यांनी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध केला. या वेळी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रा. के. डी. कांचन, हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राजाराम कांचन, उरुळी कांचन विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष संतोष कांचन, माजी उपसरपंच युवराज कांचन, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब कांचन, तंटामुक्ती समिती अध्यक्ष अमित कांचन, माजी तंटामुक्ती अध्यक्ष देविदास कांचन, महात्मा गांधी पतसंस्थेचे सचिव दत्ता तुपे, माजी पंचायत समिती सदस्य काळुराम मेमाणे, मनसे शहरप्रमुख विजय मुरकुटे, शिवसेना तालुका समन्वयक बाळासाहेब कांचन, महाराष्ट्र झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब चव्हाण, गणपत कड, सविता कांचन, छाया महाडिक आदी उपस्थित होते. या वेळी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ््याला चपला मारून निषेध व्यक्त केला. मात्र यापुढील काळात शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत शेतकरी कृती समिती आक्रमक पवित्रा घेणार असल्याचे समितीने जाहीर केले.
हवेलीत प्रतिकात्मक अंत्ययात्रा; सरकारचा निषेध
By admin | Published: June 06, 2017 1:46 AM