सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच नेत्यांच्या दौऱ्यांना सुरुवात झाली आहे. आरोप प्रत्यारोपांवरुन आता राजकीय वातावरण तापू लागलंय. दरम्यान, एका सभेदरम्यान उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. "इकडेच व्यासपीठ लावू. मोदीजी तुम्हीही या. मी महाराष्ट्राचा माजी मुख्यमंत्री म्हणून येतो. अडीच वर्षात मी काय केलं हे सांगतो, तुम्ही १० वर्षात काय केलं हे तुम्ही सांगा," असं म्हणत निशाणा साधला होता. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जोरदार टोला लगावला.
"अडीच वर्षात आम्ही काय केलं हे सांगतो, तुम्ही एका मंचावर या असं उद्धव ठाकरे म्हणाले. अडीच वर्षात ते घरीच बसले होते. फेसबुक लाईव्ह करायचं अन् कोमट पाणी प्या म्हणायचं याशिवाय यांनी काहीच केलं नाही. नागपूर उपराजधानीचं शहर, यात देखील ते आले नाहीत. माझं त्यांना खुलं आव्हान आहे, आमच्या नागपूरचा एखादा प्रवक्तादेखील स्टेजवर उभा राहिला, तर तुमच्याकडे सांगायला १० कामं नाहीत," असं म्हणत फडणवीस यांनी टोला लगावला.
काय म्हणालेले उद्धव ठाकरे ?
"महाविकास आघाडीचं सरकार असताना अनेक कामं केली. तासभर बोलायला लागलो तरी तो कमी पडेल इतकी कामं केलीयेत. निवडणुकीत एकमेकांवर दोषारोप करण्यापेक्षा अशी एक निवडणूक करा, माझी तयारी आहे, इकडे व्यासपीठ लावू मोदीजींनी यावं, मी महाराष्ट्राचा माजी मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्षात काय काय केलं हे मी सांगतो. तुम्ही १० वर्षात काय केलं हे तुम्ही सांगा. नुसती टीका करत राहायची," असं उद्धव ठाकरे म्हणाले.