बाळासाहेब कुलकर्णी / सासवडपंधरा जणांच्या पालातील कुटुंबात वास्तव्य करणारा, शिक्षणाचा घरात गंध नसताना गल्लीगल्लीतून आणि खेड्यापाड्यांतून जडीबुटीची विक्री करीत फिरणाऱ्या भटक्या विमुक्त जातीच्या समाजातील २२ वर्षीय युवकाने शिक्षणाचे महत्त्व ओळखून स्वत:ला बदलण्याचा ध्यास घेतला आणि बघता-बघता हा तरुण वाणिज्य शाखेचा पदवीधर झाला. केवळ पदवीधरच नव्हे, तर आता चक्क एम.कॉमच्या दुसऱ्या वर्षाचा अभ्यास करतोय. ही गोष्ट आहे सासवडच्या हिवरे रस्त्यावरील लक्ष्मीनगरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या चितोडी लोहार समाजातील एका युवकाची.रामूसिंग जनकसिंग चितोडिया असे या युवकाचे नाव आहे. चाळीसगाव हे त्याचे मूळ गाव असून, सुमारे २० कुटुंबे आणि ८० पेक्षा जास्त लोकसंख्या असणारी ही मंडळी सुमारे १५ वर्षांहून अधिक काळ सासवडच्या हिवरे रस्त्यावरील लक्ष्मीनगरात राहून परिसरात जडीबुटी विक्री करून गुजराण करीत आहेत.जवळच्याच नातेवाइकांची मदत घेत पुण्यात भोसरी येथील समता माध्यमिक विद्यालयात अनेक अडचणींवर मात करीत पहिली ते पाचवीपर्यंतचे त्याने शिक्षण पूर्ण केले. कौटुंबिक अडचणीमुळे परत शिक्षणात व्यत्यय आला; पण मुख्याध्यापक पडवळ सर व वर्गशिक्षक कदम सर यांच्या प्रयत्नातून १७ नंबरचा फॉर्म भरून रामूसिंग छोटी-मोठी कामे करून २००९मध्ये ५० टक्के गुण मिळवून दहावी पास झाला. त्याच्यातील शिक्षणाची ओढ त्याला गप्प बसू देईना. २०११मध्ये प्रचंड इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर तो बारावी झाला. त्यानंतर कॉमर्सला अॅडमिशन घेऊन २०१५ला बी. कॉम पदवी घेतली.आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा...रामसिंग, भगवानसिंग आणि महेंद्रसिंग या आपल्या तीन भावांसोबत झोपडीत राहत असलेल्या रामूसिंगसह एकूण १५ जणांचे हे कुटुंब आहे. रामूसिंगच्या शिक्षणवेडामुळे त्याच्या भावांची चार मुलेदेखील सासवडला शाळेत जात आहेत. रामूसिंगने झोपडपट्टीतील अन्य कुटुबांनाही शिक्षणाचे महत्त्व सांगितल्याने सुमारे २० मुले सध्या शिक्षण घेत आहेत. रामूसिंग याचा भाऊ भगवानसिंग हा केवळ दुसरी शिकला आहे. शासकीय अनुदान, रोजगाराच्या संधी उपलब्ध कराव्यात आणि सर्वांत महत्त्वाचे समाजाने आमच्या जातीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा, अशी अपेक्षा रामूसिंग आणि त्याचे कुटुंबीय करीत आहेत. भावांची पायपीट थांबवायचीय..सध्या रामूसिंग सासवडच्याच एका पतसंस्थेत काम करीत एम.कॉमचा अभ्यास करतोय. एम.कॉम पूर्ण झाल्यावर एखादी सरकारी नोकरी मिळून कुटुंबाला हातभार लावण्याची आणि आपल्या ३ मोठ्या भावांची पायपीट थांबवण्याची स्वप्ने सध्या तो पाहतोय...
जडीबुटीची विक्री करीत तो झाला पदवीधर
By admin | Published: March 27, 2017 2:23 AM