जयवंत आदाटे, जत (जि.सांगली) :खानापूरजवळील माणिकवाडी (ता. जि. बेळगाव) जंगलात सापडलेला अनोळखी मृतदेह व रुद्रगौडा पाटील याच्या चेहऱ्यात काही प्रमाणात साम्य असले, तरी तो मृतदेह रुद्रगौडाचा नाही, असे ठाम मत रुद्रगौडाचे काका व काराजनगी (ता. जत) येथील गावकामगार पोलीस-पाटील चनगोंडा आप्पासाहेब पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. ज्येष्ठ कन्नड साहित्यिक आणि विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी (कर्नाटक) यांच्या हत्या प्रकरणातील संशयित मारेकऱ्यांच्या रेखाचित्राशी साम्य असणारा एक मृतदेह माणिकवाडी (जि. बेळगाव) येथील जंगलात सापडला आहे. या संदर्भातील माहिती बुधवारी प्रसारमाध्यमांनी दिल्यानंतर खळबळ उडाली.रुद्रगौडाचे चुलत भाऊ शिवानंद पाटील म्हणाले की, ‘तो अनोळखी मृतदेह रुद्रचा नाही. वृत्तवाहिन्या आणि वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झालेल्या बातम्यांवरून आम्हाला माहिती मिळाली आहे. पोलिसांनी या संदर्भात आम्हाला कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.’ ‘मृतदेह रुद्रगौडाचा आहे किंवा नाही, हे सिद्ध करण्यासाठी आमची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे, असे आम्हाला वर्तमानपत्रांतून समजले. प्रत्यक्षात या संदर्भात पोलिसांकडून कोणतीही सूचना देण्यात आली नाही,’ असे रुद्रगौडाच्या आई-वडिलांनी सांगितले.
‘तो’ मृतदेह रुद्रगौडाचा नाही
By admin | Published: October 30, 2015 1:18 AM