“१९८३ पासून आजतागायत सलग ४० वर्षे पुण्याचे प्रतिनिधित्व करणारे भारतीय जनता पार्टीचे खासदार गिरीश बापट हे खऱ्या अर्थाने पुणेभूषण होते”, अशा शब्दात उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहिली.
“चारदा नगरसेवक, त्यानंतर सलग पाचवेळा आमदार, मंत्री व त्यानंतर आता खासदार झालेल्या गिरीश बापटांशी भाजपा स्थापनेपासून म्हणजेच १९८० पासून स्नेहसंबंध होता. मी भाजपा मुंबईचा पहिला अध्यक्ष तर ते भाजपा युवा मोर्चा, पुण्याचे पहिले अध्यक्ष होते. तेव्हापासून ते आजाराने अंथरुणावर पूर्णतः खिळेपर्यंत गिरीश बापट म्हणजे मूर्तीमंत उत्साह असलेले तडफदार नेतृत्व होते. सर्वसामान्य जनतेशी थेट संवाद साधणारा, समस्या निराकरणासाठी तात्काळ झटणारा नेता अशी सार्थ प्रतिमा असलेले बापट शेवटच्या आजारपणातही पक्षाच्या प्रचारासाठी सतत कार्यरत होते. या समर्पित सहकाऱ्याला माझी विनम्र श्रद्धांजली”, असेही राम नाईक म्हणाले.