ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 - विले पार्ले येथील महिला डॉक्टरच्या हत्येप्रकरणी तिच्याच परिसरात राहणा-या देवाशीष धारा नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. 6 डिसेंबर 2016 रोजी आरोपी देवाशीषने महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या केली. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांना आरोपीला गजाआड करण्यात यश आले.
दरम्यान, महिला डॉक्टरची हत्या केल्यानंतर आरोपी जवळपास एक महिना परिसरातच मोकाट वावरत होता. मात्र एक महिन्यानंतर जेव्हा स्वतःचा फोटो प्रसिद्धी माध्यमांमध्ये पाहिल्यानंतर घाबरगुंडी उडालेल्या आरोपीने पश्चिम बंगालमधील मिदानपूर जिल्ह्यातील आपल्या घरी पळ काढला.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी देवाशीष धारा विले पार्लेतील एका मंदिरजवळ गेल्या सात वर्षांपासून भाड्याच्या घरात राहत आहे. महिला डॉक्टरचे घर या मंदिरापासून जास्त दूर नव्हते. एकाच परिसरात राहत असल्याने आरोपीला डॉक्टरचा दिनक्रम माहिती होता.
आरोपी एका ज्वेलर्सच्या दुकानात काम करत होता. धक्कादायक बाब म्हणजे तो अमली पदार्थांच्या आहारी गेला होता. अमली पदार्थांचे सेवन करुन तो उशीरा रात्रीपर्यंत परिसरात इकडे-तिकडे भटकायचा, लोकांच्या घरात शिरायचा, वाकून पाहायचा. घटनेच्या दिवशीही नशा करुन परिसरात फिरत असताना सुरुवातीला त्याने तळमजल्यावरील एकाच्या घराची पाहणी केली.
त्यानंतर तो महिला डॉक्टरच्या घरात घुसला. तिच्या घराचे दार अर्धवट उघडे होते, आणि ती गाढ झोपेत होती.
याचाच फायदा घेत आरोपी डॉक्टरच्या घरात शिरला. या वासनांधाने तिच्यावर बलात्कार करुन तिची हत्या केली व काहीच न झाल्याचा आव आणून तो घराकडे चालता झाला. या घटनेनंतर एक महिन्यापर्यंत नोकरीवर जाणे आणि येणे, असा त्याचा दिनक्रम सुरू होता.
मात्र, या घटनेमुळे परिसरात बरीच खळबळ माजली होती. आरोपींपर्यंत पोहोचणे हे पोलिसांसमोर एक आव्हान होते. यादरम्यान पोलिसांनी परिसरातील जवळपास 40 ते 50 सीसीटीव्हींची तपासणी केली. या तपासणीदरम्यान देवाशीष धारावर पोलिसांचा संशय आला. महिला डॉक्टरच्या घराशेजारी वावरत असतानाचे त्याचे सीसीटीव्ही फुटेज जानेवारीदरम्यान मीडियामध्ये आले. टीव्हीवर स्वतःचा फोटो पाहून देवाशीष घाबरला आणि गाशा गुंडाळून 8 जानेवारी रोजी त्याने मुंबईतून पळ काढला.
तोपर्यंत मुंबई पोलिसांना आरोपी फरार झाल्याची पुसटशीही कल्पना आली नाही. यानंतर चौकशीदरम्यान पोलिसांनी त्याचे नाव, पत्त्यासहीत सर्व माहिती मिळवली. यानंतर देवाशीषच्या नोकरीच्या ठिकाणाची माहिती मिळाली. ज्वेलर्सच्या दुकानात चौकशीसाठी गेल्यानंतर आरोपी फरार झाल्याचे पोलिसांनी समजले. पोलिसांनी ताबडतोब तपासाची चक्र फिरवली व त्याचा सर्व इतिहास काढला. केवळ दोन दिवसांतच आरोपी देवाशीष धाराच्या पश्चिम बंगालमधून मुसक्या आवळण्यात आल्या.