मुंबई : बिल्डरधार्जिण्या प्रशासनाकडून एका दलित लेखकावर अन्याय होत असल्याचा आरोप करत ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड यांनी गोरेगावमधील दादासाहेब फाळके चित्रनगरीतील उपाहारगृहात पत्नीसह स्वत:ला कोंडून घेतले. सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे उपाहारगृहाचा करार करत नाहीत, तोपर्यंत उपाहारगृहातच पत्नीसह बेमुदत उपोषण करणार असल्याचे गायकवाड यांनी ‘लोकमत’ला सांगितले.चित्रनगरी महामंडळाला नियमानुसार भाडे देण्याची तयारीही गायकवाड यांनी दाखवली आहे. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशाचे कारण देत महामंडळ प्रशासन ही मोक्याची जागा बिल्डरच्या घशात घालायला निघाल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे. ते म्हणाले की, १९९३ पासून तीन वेळा करारवाढ झाली. मात्र २०११ साली बिल्डरचा डोळा या जमिनीवर पडला आणि प्रशासनाने मुदतवाढ देण्यास नकार दिला. सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे हेही सूडबुद्धीने कारवाईला प्रोत्साहन देत आहेत. (प्रतिनिधी)न्यायालयाच्या निकालानुसारच कारवाईसाहित्यिक लक्ष्मण गायकवाड यांना चित्रनगरीमध्ये भाडेतत्त्वावर देण्यात आलेला भूखंड त्यांनी मेसर्स प्रफुल फास्टफूड यांना उपाहारगृह चालविण्यासाठी दिला होता. सदर भूखंडाचा करार संपुष्टात आल्यानंतर चित्रनगरीच्या महामंडळाने त्यावर कायदेशीर कार्यवाही सुरू केली. न्यायालयानेही सदर कारवाई ग्राह्य धरत हा भूखंड पुन्हा ताब्यात घेण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या निकालानुसारच गायकवाड यांच्या उपाहारगृहावर कारवाई करण्यात आली. या सर्व कारवाईमध्ये माझी कुटनीती कुठे येते? - विनोद तावडे, सांस्कृतिक कार्यमंत्री
‘उचल्या’काराने पत्नीसह कोंडून घेतले
By admin | Published: February 11, 2016 3:47 AM