मुंबई - कोरोनासोबत राज्यातील नागरिकांवर आणखी एक संकट कोसळले आहे ते म्हणजे वाढीव वीज बिलाचे. वाढीव वीज बिलांनी नागरिकांना जोरदार शॉक दिल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. नागपूरमध्ये वीज बीलाचा आकडा पाहून धक्का बसल्याने एका 57 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. या व्यक्तीच्या कुटुंबीयास 40 हजार रुपये वीजबील आले होते, याच धसका घेतल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी नागपूर शहर पोलिसांनी माहिती दिली. लॉकडाऊन काळातील 3 महिन्यांच्या वीज बिलाची ही रक्कम पाहून ग्राहकांची पायाखालची जमीनच सरकताना दिसत आहे. यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून वीज बिलासंदर्भात नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देण्याचे सूचवले होते. मात्र, अद्यापही नागरिकांना वीज बिलाच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
नागपूर शहरात शनिवारी दुपारी यशोधरा नगर येथील 57 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. पीटीआय एजन्सीच्या वृत्तानुसार, लीलाधर लक्ष्मण गैधा यांना 40 हजार रुपये वीज बिल आल्याचे समजताच, त्यांना धक्का बसल्याचे कुटुंबीयांनी म्हटले आहे. जादा वीज बील आल्यामुळे लीलाधर यांनी जास्त दारू पिण्यास सुरुवात केली होती. त्याच नैराश्येतून शनिवारी दुपारी अंगावर रॉकेल टाकून त्यांनी स्वत:ला पेटवून घेतले. त्यानंतर, कुटुंबीयांनी तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते.
लीलाधर हे आपल्या घरातील ग्राऊंड फ्लोअरला राहात होते, तर दुसऱ्या मजल्यावर भाडेकरू राहत आहेत. लीलाधर यांच्या घरात कुठेही सुसाईड नोट न आढळल्याने लीलाधर यांच्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, ग्राहकांना जास्त रकमेची देयके मिळत असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत देयक आकारणीत अधिक पारदर्शकता आणावी आणि ग्राहकांच्या तक्रारींचे ताबडतोब निराकरण करण्यासाठी संनियंत्रण यंत्रणा उभारावी, असे निर्देश महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने वीज कंपन्यांना दिले आहेत. ग्राहकाच्या गाऱ्हाण्यांचे निवारण केल्याशिवाय कोणाचाही वीज पुरवठा खंडीत करण्यात येऊ नये, असे आयोगाने निर्देश दिले आहेत.