Rahul Gandhi Sangli Speech PM Modi : मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. या दुर्घटनेवरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. जो चुकीचे काम करतो, तोच माफी मागतो, असे म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले. स्व. पतंगराव कदम यांच्या पुर्णाकृती पुतळा अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते.
राहुल गांधी म्हणाले, "आज आपण कदमजींच्या पुतळ्याचे अनावरण केले. तिथे असताना मी विचार करत होतो की, कदमजींनी ६० वर्षे आपल्यासोबत काम केले. त्यांनी प्रामाणिकपणे काम केले. त्यांनी ६० वर्षात कधीही माफी मागितली नाही. का मागितली नाही, कारण गरज पडली नाही. हेच सत्य आहे. माफी तोच मागतो, जो चुकीचे काम करतो", असे म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले.
मोदींनी माफी कोणत्या कारणासाठी मागितली? राहुल गांधींचा सवाल
पुढे बोलताना ते म्हणाले की, "काही दिवसांपूर्वी इथे शिवाजी महाराजांचा पुतळा बनवला. मी वृत्तपत्रात वाचले की, पंतप्रधान म्हणाले, मी शिवाजी महाराजांची माफी मागतो. मला हे समजून घ्यायचे आहे की, पंतप्रधानांनी कोणत्या कारणासाठी माफी मागितली?"
"अनेक कारणे असू शकतात. पहिले कारण असू शकते की, हा जो पुतळा होता, त्याचे कंत्राट आरएसएसच्या व्यक्तीला दिले होते. कदाचित पंतप्रधानांना म्हणायचे आहे की, मी हे कंत्राट आरएसएसच्या व्यक्तीला द्यायला नको होते. मी हे कंत्राट गुणवत्तेच्या आधारावर द्यायला पाहिजे होते", असे म्हणत राहुल गांधी मोदींना लक्ष्य केले.
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाला असेल -राहुल गांधी
राहुल गांधी पुढे म्हणाले, "दुसरी चूक असू शकते की, पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाला. चोरी झाली. कदाचित पंतप्रधान यासाठी माफी मागत आहेत. मी ज्याला कंत्राट दिले, त्याने भ्रष्टाचार केला. महाराष्ट्राच्या लोकांसोबत चोरी केली. हे कारण असू शकते. तिसरे कारण असू शकते की, तुम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा बनवला. त्यांची आठवण म्हणून तुम्ही पुतळा बनवला आणि तो पुतळा उभा राहिली याकडे तुम्ही लक्ष दिले नाही."
"मी खात्री देतो की, कदमजींचा हा पुतळा बनला आहे ना, तुम्ही इथे पन्नास, साठ, सत्तर वर्षांनंतर येऊ बघा. तो तुम्हाला इथे दिसेल. शिवाजी महाराजांचा पुतळा बनतो आणि काही दिवसांत भ्रष्टाचार, चुकीच्या व्यक्तीला कंत्राट देण्याच्या कारणामुळे तो पुतळा पडतो. शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. पंतप्रधानांनी फक्त शिवाजी महाराजांची माफी मागू नये. जर माफी मागायची असेल, तर महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीची मागायला हवी", असे राहुल गांधी म्हणाले.